कल्याण: निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यासह देशभरात एसआयआर मोहीम सुरू आहे. या कामासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील चार विधानसभा मतदार संघात बीएलओ नेमण्यात आले आहेत.
या कामाकरिता शिक्षकांना मदतीला घेण्यात आले आहे. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे की, अशैक्षणिक कामे करायची हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो.
आत्ता महापालिका हद्दीतील काही शिक्षकांनी या कामातून त्यांची मान काढून घेतल्याने या कामासाठी महापालिकेने सफाई कामगार आणि आशा वर्कर यांना नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होणार आहे.
महापालिका हद्दीत कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण हे चार विधानसभा मतदार संघ आहे. केवळ कल्याण पश्चिम मतदार संघात ४११ बीएलओ नेमण्यात आले आहे.
उर्वरित तीन मतदारसंघात याप्रमाणे सरासरी १२०० बीएलओ असू शकतात. काही शिक्षकांनी त्यांच्या आजारपणाची आणि अन्य कारणे देत राजकीय पक्षाच्या नेते मंडळीचा प्रभाव वापरून त्यांची या कामात सुटका करून घेतली आहे. आत्ता त्यांच्या जागी महापालिकेचे सफाई कामगार आणि आशा वर्करची नेमणूक केली जाणार आहे.
या नेमणुकीस म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन बासरे यांनी जोरदार विरोध केला आहे. सफाई कामगार आणि आशा वर्करचे काम आरोग्याशी निगडीत आहे. त्यांची कामे कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सफाई कामगार आणि आशा वर्कर यांना एसआयआरचे काम मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून ज्या तरुण-तरुणींनी प्रशिक्षण घेतले, त्यांना एसआयआरचे काम द्यावे, अशी मागणी बासरे यांनी केली आहे.
काम महिन्याभरापुरते...
दरम्यान यासंदर्भात महापालिकेच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, एसआयआरचे काम हे केंद्र आणि राज्य सरकारसह निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. त्यांच्या आदेशानुसार या कामाची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. हे काम वेळेत पूर्ण करायचे आहे. सफाई कामगार आणि आशा वर्कर यांना संबंधित प्रभागातील घरे माहिती आहेत. बीएलओच्या कामासाठी त्यांची मदत होणार आहे. हे काम महिन्याभरापुरते आहे.
६ हजार फॉर्म्सचे वाटप...
नुकतेच कल्याणमधील उर्दू हायस्कूलमध्ये एसआयआरचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ३२ बीएलओंनी मतदारांना ६ हजार ३०० इन्युमरेशन फॉर्म्सचे वाटप केले. यापैकी १५०० नागरिकांनी त्याच ठिकाणी त्यांचे फॉर्म भरून जमाही केले. मतदारांना इन्युमरेशन फॉर्म मिळण्यात मोठ्या अडचणी येतात. दरम्यान काही बीएलओ घराेघरी जात नाहीत. फोनही घेत नाहीत. ही बाब लक्षात घेता हे शिबीर घेण्यात आले.