भाईंदर :मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील नवीन मालमत्तांवर वाढीव कर आकारण्याचा ठराव गेल्या महासभेत भाजप सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर केला. त्याला काँग्रेसने विरोध दर्शविला असतानाच त्यात शिवसेने उडी घेत याविरोधात मंगळवारी (24 फेबु्रवारी) रोजी पालिकेवर भीक मँगो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या पहिल्या महासभेत शहरातील भाडेतत्वावर आधारीत मालमत्ता कर दरांचे फेरबदल करुन सुधारीत दर मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. मात्र भाजप सत्ताधाऱ्यांनी 1 एप्रिलपासून कर आकारणीच्या कक्षेत येणाऱ्या मालमत्तांपैकी नवीन निवासी मालमत्तांवर सुमारे 44 टक्के तर व्यावसायिक मालमत्तांवर 50 टक्के कर वाढ करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला.
यात सध्याचा निवासी मालमत्ता कर 2 रुपये 80 पैसे प्रती चौरस फूट इतका असून त्यात नवीन निवासी मालमत्तांसाठी 1 रुपये 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे 1 एप्रिल पासून नव्याने कर आकारणीच्या कक्षेत येणाऱ्या नवीन निवासी मालमत्तांना 4 रुपये प्रती चौरस फूट दराने कर भरावा लागणार आहे. तसेच व्यावसायिक मालमत्तांच्या सध्याच्या 4 रुपये प्रती चौरस फूट दरात तब्बल 2 रुपये म्हणजेच 50 टक्के वाढ करून 1 एप्रिलपासून कर आकारणीच्या कक्षेत येणाऱ्या नवीन व्यावसायिक मालमत्तांना 6 रुपये प्रती चौरस फूट दराने कर भरावा लागणार आहे.
यामुळे नवीन मालमत्ताधारकांना ज्यादा रक्कमेने कर भरावा लागणार असल्याने नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांना ज्यादा कर भरण्याची तजवीज करूनच नवीन मालमत्ता खरेदी कराव्या लागणार आहेत. यात नवीन निवासी मालमत्ताधारकांवर वाढीव कराचा बोजा अधिक पडणार असला तरी भाजपने मंजूर केलेला ठराव चुकीच्या पद्धतीने मंजूर केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल सावंत यांनी केला आहे.
ठराव रद्द करा, करवाढीचा निर्णय चिघळण्याची चिन्हे
वास्तविक या महासभेत शहरातील भाडेतत्वावर आधारीत मालमत्ता कर दरांचे फेरबदल करुन सुधारीत दर मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यावर निर्णय न घेताच वाढीव कराचा कोणताही प्रस्ताव चर्चेसाठी आणण्यात आला नसतानाही तो मंजूर करण्यात आल्याचे काँग्रेस गटनेता जय ठाकूर यांनी सांगितले. यामुळे हा ठराव रद्द करण्यासाठी तो शासनाकडे पाठविण्यासाठी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना पत्र देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. तर सत्ताधाऱ्यांच्या या वाढीव कराच्या ठरावाविरोधात शिवसेनेने मंगळवारी पालिका मुख्यालयावर भीक मांगो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याने कर वाढीचा निर्णय चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.