अंबरनाथ : पुढील काही दिवसात आचारसंहिता जाहीर होऊन नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. यंदा नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेमधून होणार असल्याने शिवसेना नगराध्यक्ष पदासाठी चाचपणी करत आहे. शिवसेनेत काही नावे पुढे येत असताना आता विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पत्नी शिल्पा किणीकर यांच्या नावाची चर्चा देखील सर्व स्तरातून होऊ लागली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची संधी कुणाला मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मागील 25 वर्षांपासून अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. नगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. आता येत्या काही दिवसात आचारसंहिता लागून निवडणुका होणार असल्याने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेमधून होणार असून, नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने शहरातील शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या पत्नीसाठी लॉबिंग सुरू केली आहे.
माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या पत्नी अनिता सुनील चौधरी, मनिषा अरविंद वाळेकर, माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर, सुवर्णा सुभाष साळुंके, विना पुरुषोत्तम उगले यांच्या नावाची चर्चा असताना आता त्यात विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पत्नीचे नाव देखील समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अंबरनाथमध्ये दोन गट
अंबरनाथमध्ये मागील काही वर्ष्यात शिवसेनेत माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर असे दोन गट आहेत. या दोन्ही गटाची डोकेदुखी पक्ष्याला सहन करावी लागते. त्यामुळे आता नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे नगराध्यक्ष पदाचे नाव कोणत्या गटाचे समोर येते, किव्हा गटबाजी झुगारून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे नवीन आश्वासक चेहेऱ्याला संधी देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पक्षाने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. त्यामुळे आता मला इतर कुणाचाही हक्क डावलायचा नाही. परंतू ज्यांनी खासदार व आमदार निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात काम केले आहे. त्यांना उमेदवारी मिळू नये. पक्षाने कोणत्याही सर्वसामान्य शिवसैनिकांच्या डोक्यावर हात ठेवावा, त्याला आम्ही सर्व मिळून निवडून आणू.डॉ. बालाजी किणीकर, आमदार