Shide's Shiv Sena municipal election news
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी शिंदेंच्या शिवसेनेला मात्र महापालिका निवडणुकांची लगीनघाई लागली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी उद्घाटनासाठी येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालिका अधिकार्यांना दिले आहेत. यामध्ये उद्याने, विहिरी, स्मशानभूमी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कलादालन अशा विविध विकास कामांचा समावेश आहे.
स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरी सुविधांचा आणि कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी एक विशेष बैठक लावली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह एम एम आर डी ए, पी डब्लू डी, एम एस आर डी सी आणि ठाणे महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार 700कोटींचा निधी या मतदार संघा करिता दिला असून विविध नागरी सुविधाच्या कामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यामध्ये 12 उद्यानांपैकी 8, दोन तरण तलाव, पुनर्जीवित करण्यात आलेल्या चार विहिरी, दोन स्मशानभूमी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र आणि उपवन येथील कलादालन आदी कामांचा समावेश असून येत्या 15 ऑगस्टपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनातील अधिकार्यांना मंत्री सरनाईक यांनी दिले. मी मंत्री असलो तरी एका पक्षाचा आमदारही आहे, त्यामुळे राजकीय विचार करावा लागतो. त्यामुळे झालेल्या नागरी सुविधानाचे लोकार्पण निवडणुकीच्या आधी करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
घोडबंदर मार्गांवरील सेवा रस्ता काँक्रिटीकरण, लता मंगेशकर संगीत विद्यालय, या कामा बरोबरच शेतकर्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात देण्यात येणार्या कन्स्ट्रक्शन, टीडीआर करिता लागणारा कालावधी याबाबत देखील मंत्री सरनाईक यांनी सूचना केल्या. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शिवसेना शिंदे गटाने त्यामध्ये बाजी मारली असून शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय घेऊन निवडणुकीत बाजी मारण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.