

Municipal Corporation's solid waste service charges will increase
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून दिल्या जाणार्या खासगी सेवांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. खासगी मालमत्तेमधील सेफ्टीक टँकची स्वच्छता, कचरा आणि रॅबिट उचलणे तसेच रस्त्यावरील मेलेली जनावरे उचलणे यासाठी नागरिकांना यापुढे अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे. पुढच्या तीन वर्षासाठी हे अधिकचे शुल्क निश्चित करण्यात आले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलणे आणि स्वच्छतेची जबाबदारी ठाणे महापालिकेची असली तरी, स्वच्छतेसंदर्भात खासगी सेवा देण्यासाठी शहरातील गृहसंकुले, आस्थापना आणि इतर खासगी मालमत्तेत सेवा देण्यासाठी महापालिकेकडून विशेष सेवा दर आकारले जातात. आता याच सेवा दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून घेण्यात आला आहे. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलांची निर्मिती होत असून प्रशासनाला या सेवा देताना अधिकचा ताण सहन करावा लागणार आहे.
याशिवाय संपूर्ण शहरात मलनिस्सारण व्यवस्था कार्यान्वित नसल्याची कबुली प्रशासनाच्या वतीनेच देण्यात आली असल्याने ही सेवा महापालिकेला विशिष्ट शुल्क आकारून द्यावी लागते. अशाप्रकारच्या सेवा देताना खासगी गृहसंकुलांमधील सेफ्टीक टँकची स्वच्छता करण्यासाठी तांत्रिक पद्धतीने ही स्वच्छता करावी लागते. याशिवाय खासगी मालमत्तेतील कचरा आणि रॅबिट उचलणे तसेच मेलेली जनावरे उचलणेसाठी देखील महापालिकेकडून शुल्क आकारण्यात येत असून यामध्ये पुढच्या तीन वर्षात वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
सेवा वर्ष 2024-25 2025-26 2026-27 2027-28
सेफ्टीक टँक साफ करणे 2350 रुपये 2600 रुपये 2850 रुपये 3150 रुपये
वाणिज्य स्वरूपातील सेफ्टीक टँक साफ करणे 3500 रुपये 3850 रुपये 4250 रुपये 4650 रुपये
खासगी मालमत्तेतील कचरा, रॅबिट उचलणे 10200 रुपये 11200 रुपये 12200 रुपये 13500 रुपये
मेलेली जनावरे उचलणे (मोठी) 2350 रुपये 2600 रुपये 2850 रुपये 3150 रुपये
मेलेली जनावरे उचलणे (लहान) 1450 रुपये 1650 रुपये 1750 रुपये 1950 रुपये