राजेश जागरे
शहापूर: एका बाजूला कडक ऊन, दुसऱ्या बाजूला पाण्याची आणि चाऱ्याची चिंता, तर कधी बिबट्याच्या हल्ल्याची भीती, डोक्यावर आभाळ आणि
मेंढरांच्या कळपातच सुख-दुःख शोधणाऱ्या या कुटुंबांचा संसार म्हणजे सततची भटकंती, कष्ट आणि अनिश्चिततेशी सुरू असलेली झुंज. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, ढवळपुरी आणि पारनेर परिसरातून आलेल्या खताळ व कोळपे कुटुंबांच्या जगण्याची ही कहाणी मनाला चटका लावणारी आहे.
महादू खताळ, लालू खताळ, सुहास खताळ, शरद कोळपे, निलेश खताळ आणि समाधान कोळपे अशी नावे सांगणाऱ्या या मेंढपाळ कुटुंबांचा संसार मेंढ्या-बकऱ्यांच्या कळपाभोवती फिरतो. सुमारे ७०० मेंढ्या, पन्नास बकऱ्या, पाच-पंचवीस कोंबड्या आणि दहा घोड्यांसह तीन कुटुंबांचा हा प्रवास सुरू आहे.
पिढ्यान्पिढ्या मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्या या कुटुंबांची चौथी पिढीही आज याच परंपरेतून पुढे जात आहे. मात्र बदलत्या परिस्थितीत हा पारंपरिक व्यवसाय टिकवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असल्याची भावना महादू खताळ यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना दिली.
पावसाची अनिश्चितता आणि चाऱ्याची कमतरता यामुळे यंदा नेहमीपेक्षा लवकर घरदार सोडून बाहेर पडावे लागल्याचे ते सांगत होते. महाशिवरात्रीच्या सुमारास घरी परतण्याची त्यांची अपेक्षा असते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे मुक्कामाचे नियोजनही त्यांच्या हातात राहत नाही. आज एका माळरानावर तर
उद्या दुसऱ्या गावाच्या परिसरात असा त्यांचा प्रवास सुरू असतो. घरातील लहान मुलांचे शिक्षण, कुटुंबाची सुरक्षितता, जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था या जबाबदाऱ्या पाठीवर घेऊन त्यांना भटकंती करावी लागते. काही मुले शाळेत जातात.
सततच्या स्थलांतरामुळे शिक्षणात खंड पडतो. समाधान कोळपे हा ६वीत शिकत होता. मात्र शाळेत मन रमत नसल्याने त्याच्या शिक्षणाचा प्रश्नही भटक्या जीवनातील अडचणी अधोरेखित करतो.
वन विभागाचा कथित जाच; शासनाच्या हस्तक्षेपाची गरज
वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी चराईच्या प्रश्नावर त्रास देत असल्याची तक्रार मेंढपाळांनी प्रस्तुत प्रतिनिधीसमोर मांडली. एका बाजूला बिबट्यांच्या हल्ल्यांत
मेंढ्या-बकऱ्या गमावण्याची भीती तर दुसरीकडे चारा-पाण्यासाठी करावी लागणारी वणवण आणि त्यातच चराईच्या परवानगीचा प्रश्न अशा दुहेरी-तिहेरी संकटांत मेंढपाळांचा पारंपरिक व्यवसाय अडकला आहे.
पिढ्यान्पिढ्या मेंढपाळी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांनी अखेर जगायचे तरी कसे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. किंबहुना वनसंवर्धनाच्या नावाखाली पारंपरिक मेंढपाळांना चराईसाठी अडचणींचा सामना करावा लागत असेल तर प्रशासनाने त्याची दखल घेणे आवश्यक आहे.
डहाणू, मुरबाड, वाडा, शहापूरकरांच्या मायेने मिळतो जगण्याला आधार
भटकंतीच्या वाटेवर गावोगावी मुक्काम करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र शहापूर, मुरबाड, वाडा आणि डहाणू परिसरातील नागरिकांकडून मिळणारे प्रेम, आपुलकी आणि सहकार्य आमच्यासाठी मोठा आधार असल्याचे सांगताना मेंढपाळ लालू खताळ भावूक झाले.
अनोळखी गाव, अनोळखी माणसे आणि माळरानावरचा तात्पुरता संसार अशा परिस्थितीतही नागरिक माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात देतात. त्यामुळे घरापासून दूर असतानाही परकेपणाची जाणीव होत नाही. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. एका बाजूला भटकंतीचे कष्ट, तर दुसऱ्या बाजूला माणुसकीच्या मायेची ऊब, याच बळावर मेंढपाळांचा प्रवास सुरू आहे.