ठाणे

ठाणे : ‘भाविका’ घडवतेय वीट भट्टी कामगारांच्या मुलांचे भवितव्‍य

backup backup

मुरबाड, पुढारी वृत्तसेवा : कर्जतमधील दुर्गम भागात राहणारे आदिवासी, कातकरी समाजातील कुटुंब वीटभट्टी कामगार म्हणून कायम स्थलांतर करीत असतात. परिणामी त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेरळ बिरदोलेतील बारावीत शिकणाऱ्या भाविका भगवान जामघरे हिने ‍पुढाकार घेतला आहे. तिने वीटभट्टीवरच शाळा सुरू केली असून, सध्या ४५ मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे सहा मुले आज आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत.

शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. मात्र, दरवर्षी पावसाळा संपला की वीटभट्टी कामगार स्थलांतर करतात. त्‍यांच्याबरोबरचे त्यांची मुलेही स्थलांतरित होत असल्‍याने शिक्षणापासून वंचित राहतात. शासनाने शाळाबाह्य मुलांसाठी शोध मोहीम सुरू केली असली तरी अनेकदा वीटभट्टी लांब असल्याने मुले शाळेत जाण्यासाठी निरुत्साही दिसून येतात.

नेरळपासून दामत गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक वीटभट्ट्या आहेत. या भागातून प्रवास करताना बिरदोलेतील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या भाविकाला वीटभट्टीवर लहान मुले खेळताना अथवा आई-वडिलांच्या कामात मदत करताना दिसली. या मुलांच्या शिक्षणाची चिंता तिला गप्प बसू देत नव्हती. व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्‍या वडिलांकडे तिने वीट भट्टीवरील मुलांच्या भविष्‍याबाबत शिकवणी वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्‍यानुसार अल्‍प उत्‍पन्न असूनही त्‍यांनी पाटी, पेन्सिल, पुस्‍तके खरेदी करून १४ नोव्हेंबर २०२१ मध्ये बालदिनी अनौपचारिक शाळा सुरू केली.

दामत येथील वीटभट्टी मालकांनीही सर्व शाळाबाह्य मुलांना एकत्र करण्यासाठी मदत केली शिवाय शाळेसाठी एक खोलीही उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला २५ मुलांनी सुरू झालेल्‍या शाळेत आज ४५ मुले शिक्षण घेत आहेत. मुलांना शिकवण्यासाठी भाविकाने त्‍यांची बोली भाषाही आत्‍मसात केली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT