डोळखांब: शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील चोंढे धबधब्यावर गेलेले पाच पर्यटक वाहून गेले. यातील एकाचा मृत्यू झाला असून, एक बेपत्ता आहे. तिघांना वाचवण्यात यश मिळाले. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी धबधबे, नद्या व धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी आदेश जारी केलेले असतानाही रविवारी या धबधब्यावर सुमारे ३०० ते ४०० पर्यटकांनी गर्दी केली होती.
यावेळी पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाच पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यावेळी झालेल्या आरडाओरड्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांनी प्रसंगावधान राखत प्रसाद रमेश इंगळे, नितेश लहू पाटील आणि अजय कृष्णा मिरकुटे या तिघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, आकाश महेंद्र देशमुख यांचा मृत्यू झाला, तर दिनेश मेंडलकर यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बेपत्ता पर्यटकाचा शोध युद्धपातळीवर सुरू असून पाण्याचा प्रचंड वेग आणि अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात धबधबे, ओढे आणि नदीपात्रांमध्ये उतरण्याचे टाळण्याचे तसेच बंदी आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.