Thane Water Conservation Campaign  pudhari photo
ठाणे

Thane Water Conservation Campaign : पेंढरघोळ येथे चार वनराई बंधाऱ्यांची उभारणी

पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेला गती देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

शहापूर : शहापूर तालुक्यात पावसाने गणेशोत्सवापूर्वीच माघार घेतल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी श्रमदानातून जलसंधारण करण्याचे आवाहन केले आहे.

त्यांच्या पुढाकारातून आटगाव ग्रामपंचायत हद्दीतील पेंढरघोळ येथे ग्रामस्थ, तरुण आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून चार वनराई बंधारे बांधण्यात आले. या उपक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय निमसे, सरपंच भास्कर बरोरा, ग्रामविकास अधिकारी सावंत यांच्यासह ग्रामस्थ आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून जमिनीत मुरविणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यंदा पावसाने अपेक्षेपेक्षा लवकर माघार घेतल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन जलसंधारणाची कामे हाती घेणे गरजेचे असल्याचे पांडुरंग बरोरा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान परिसरातील ग्रामस्थ, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपापल्या गावांतील नदी, नाले आणि ओढ्यांवर श्रमदानातून वनराई बंधारे उभारावेत असे आवाहन बरोरा यांनी केले. गावागावांत लोकसहभागातून असे छोटे बंधारे उभारल्यास पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास आणि त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करण्यास मदत होऊ शकते.

तथापि वनराई बंधाऱ्यांमुळे पाणी साठविण्यास मदत होते. साठलेले पाणी पशू-पक्षी आणि पाळीव जनावरांसाठी उपयोगी ठरू शकते. तसेच पाणी जमिनीत मुरल्यास परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या भूजलपातळीत सुधारणा होण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात अशा जलसंधारणाच्या कामांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा असून गावाचे पाणी गावातच अडवून जमिनीत जिरविण्यासाठी प्रत्येकाने श्रमदानाचा संकल्प करावा.पेंढरघोळ येथील उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहावी आणि दुष्काळाच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी गावागावांत सामूहिक प्रयत्नांना सुरुवात व्हावी हीच या मोहिमेमागील अपेक्षा आहे.
पांडुरंग बरोरा, माजी आमदार, शहापूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT