डोळखांब : दिनेश कांबळे
पक्षी सप्ताह महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या माध्यमातून साजरा करण्यात येत होता; परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून प्रथमतः साल 2020 पासून शासकीय स्तरावर सुरू करण्यात आला. हा सप्ताह साजरा करणारे भारतातील प्रथम राज्य आहे. पक्षी सप्ताह पद्मश्री अरण्याऋषी मारुती चितमपल्ली आणि भारताचे पक्षी मानव पद्मभूषण डॉ. सलिम अली यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने सुरू करून तशी शिफारस महाराष्ट्र शासनाकडे केली आणि त्यांनी ती मान्य करून 27 ऑक्टोबर 2020 रोजी शासन निर्णय काढून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यास सुरुवात झाली.त्या पार्श्वभुमीवर शहापूरात पक्षी निरिक्षण कार्यक्रम पार पडला.
5 नोव्हेंबर रोजी पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने शहापूर तालुक्यातील पाझर तलाव खातिवली-वेहळोली या ठिकाणी पक्षीमित्र रोहिदास डगळे आणि भूषण विशे यांनी सकाळी पक्षी निरीक्षण व पक्षी छायाचित्रण केले. त्यामध्ये त्यांना एकूण 23 प्रकारचे पक्षी दिसून आले त्यामध्ये विशेष हिवाळी पाहुणे नदीसुरय, राखी धोबी, दलदली ससाणा दिसून आले तर सामान्य पणे आपल्या भागात आढळणारे बगळे, पाणकावळा, राखी पाकोळी, अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू, शिक्रा, कोतवाल, हळद्या, तिसा इत्यादी पक्षी दिसून आले.
अशाप्रकारे पक्षी सप्ताहाची सुरुवात पक्षनिरीक्षणाने सुरू केली असून आजच आसनगाव या ठिकाणी घोणस या विषारी सापाचे बचाव कार्य करून जंगलात मुक्त करण्यात आले.दुपारनंतर वन प्रशिक्षण संस्था शहापूर या ठिकाणी संचालक प्रदीप बुधनवार यांच्या मार्गदर्शनाने तेथील वन रक्षकांना पक्षी सप्ताहाची माहिती देऊन पुढील पक्षी निरीक्षण याविषयी पक्षीमित्र तथा वन्यजीव अभ्यासक रोहिदास डगळे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी तेथे भूषण विशे आणि सागर वेहेळे देखील उपस्थित होते.
पक्षी निरीक्षणाविषयी जनजागृती...
पक्षी सप्ताहाची सुरुवात सकाळी पक्षी निरीक्षण करून तदनंतर एका विषारी सापास निसर्गात मुक्त करून आणि सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचा समारोप वन प्रशिक्षण संस्था शहापूर येथे पक्षी सप्ताह आणि पक्षी निरीक्षण याविषयी मार्गदर्शन करून करण्यात आला. यासाठी वन प्रशिक्षण संस्था-शहापूर, तानसा वन्यजीव विभाग, वन विभाग शहापूर यांचे सहकार्याने आउल कंजर्वेशन फाउंडेशन कंजर्वेशन फाउंडेशन यांनी केले.
याप्रमाणेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करून आजच्या प्रमाणे सातही दिवस पक्षी निरीक्षण आणि पक्षी निरीक्षणाविषयी जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाची सांगता तानसा अभयारण्य या ठिकाणी होणार आहे.