मुंबई : मिलिंद कारेकर
कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासात रहिवाशांना 57 मजल्यांच्या इमारतीत 500 फुटांची घरे देण्यात येणार आहेत.परंतु इतर महत्वाच्या सुविधांबाबत मात्र रहिवासी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ते संभ्रमात पडले आहेत. लिफ्ट, कार पार्किंग, सी सी टीव्ही, मेन्टेनन्स आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर रहिवाशांशी चर्चाच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. खासगी बिल्डरपेक्षा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास झाला तर फसवणूक होण्याची शक्यता नाही, असे कामठीपुरा विकास समितीचे अध्यक्ष बी आर दोनथुला यांनी म्हटले आहे.
निवासी भाडेकरूंना 500 चौ फुटांचे घर आणि दुकानदारांना 225 चौ फुटांची जागा देण्यात येणार आहे. जमीन मालकांसाठी चौरस फुटांप्रमाणे फ्लॅट देण्यात येणार आहेत. चार फ्लॅटच्या मागे एक पार्किंग दिले जाणार आहे.
10 लाखांपर्यंतचा कॉर्पस किंवा दहा वर्षे मेंटेनन्स फ्री करा, अशी मागणी केली जाणार आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून रहिवाशांना सर्व माहिती दिली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून म्हाडाने अध्यादेश काढला आहे. लोकांना किती जागा मिळणार, चाळ मालकांना काय देणार हे सर्व सरकारने ठरवले आहे, असे दोनथुला म्हणाले.
कोणालाही विश्वासात न घेता पुनर्विकास थोपवला जात आहे. लोकांनी संमती दिली नसताना बायोमेट्रिक केले जात आहे. पिढ्यान् पिढ्या राहणाऱ्या लोकांच्या नावावर घरे झालेली नाहीत. अजून घरमालकांचे प्रश्न सुटले नाहीत. 29 चे आता 34 एकर झाले आहे. 44 हजार चौरस मीटर क्षेत्र म्हाडाला दिले जाणार आहे ते कोणत्या धोरणाप्रमाणे, असा प्रश्न स्थानिक रहिवासी आशा मामेडिय यांनी उपस्थित केला आहे.
ही जमीन आमची आहे. विडी कामगार,मिल कामगार तेलुगू भाषिक अशी गोरगरीब मंडळी इथे राहत आहेत. त्यांना कळत नाही म्हणून विकास लादला जात आहे. अक्षरशः इथे जोरजबरदस्ती आणि धमक्या देण्याचे प्रकार चालू आहेत. चार हजार मीटरमध्ये छोट्या छोट्या क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याची मागणी केली होती परंतु यांना सर्वच जमीन खाजगी विकासकाच्या गळ्यात मारायची आहे.
एल एन टी सारख्या कंपनीला काम दिले तर ह्यांना मलिदा मिळणार नाही. कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास बी डी डी चाळीप्रमाणे केला तर चांगल्या सुविधा मिळतील. रहिवाशांची आणि इथल्या लँड लॉर्ड लोकांची असोसिएशन आहे. पण त्यांना विश्वासात न घेताच मनमानी कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना महिला मिळून बॉक्स भरून तक्रार पत्र देणार आहोत. कोण म्हणतो 47 मजल्याचा टॉवर बनणार, कोण म्हणतं 50 तर कोण 57 मजल्याचा टॉवर बांधणार. या पुनर्विकासात अजिबात पारदर्शकता नाही. असाच प्रकार सुरू राहिला तर येत्या काळात कामाठीपुऱ्यातच महाआंदोलन उभारावे लागेल असे शिवसेना उपनेत्या आशा मामेडिय यांनी म्हणत राग व्यक्त केला आहे.
सर्वांना पुनर्विकास हवा आहे. परंतु कोणाला विश्वासात घेतले जात नाही. समिती आमदाराच्या फेवरमधली आहे. कोणाला विचारात घेऊन बनवलेली नाही. भाडे देणार का तात्पुरती जागा देणार? इमारत नक्की किती मजली बांधणार आहे?एका मजल्यावर जास्त घरे बांधून चाळीसारखी अवस्था करणार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
आम्हाला अंधारात ठेवून हा सर्व कारभार चालला असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून आतापर्यंत तीन वेळा येथे भेट देऊन गेले आहेत. रहिवाशांनी पुनर्विकासाला साथ दिली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या नंतरचे पहिले सभापती सयाजीराव सिलम हे कामाठीपुऱ्यातले होते. आचार्य अत्रेंबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रेसर असणारे परशुराम गोपाला हे देखील कामाठीपुऱ्यातलेच रहिवासी होते. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला छापखानादेखील कामाठीपुऱ्यातच होता, अशी माहिती स्थानिक रहिवासी आणि मनसेचे पदाधिकारी रुकेश गिरुल्ला यांनी दिली.