

सापाड : परतीच्या पावसामुळे कल्याण तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीस तयार झालेले भातपीक शेतात आडवे झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. त्यातच पावसाने घातलेल्या धुमकुळामुळे आणखीनच हैराण करून सोडल्याने शेतकरी गर्भगळीत झाले आहेत. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतली नाही तर शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता शेतकरी बांधवांनी दैनिक पुढरीशी बोलतांना व्यक्त केली आहे.
परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील 31 हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले आहे. यात कल्याण तालुक्यातील अंदाजे 3578 हेक्टर इतक्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील 56 हजार हेक्टर जमिनीत पावसाळ्यात खरीप हंगामात भाताचे पीक घेतले जाते. यात यंदा कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील 68 गाव पाड्यातील 5290 हेक्टर क्षेत्रावर भातशेतीचे पिक घेतले आहे. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हळवी, निम गरवी व गरवी भात पिके घेतली गेली आहेत.
यंदा भात शेतीला योग्य असा पाऊस पडल्याने भाताचे पीक उत्तम दर्जाचे आले होते. मात्र हे पीक शेतातून शेतकऱ्यांच्या घरात येईपर्यंत परतीच्या पावसाने या भात पिकांची पुरती नासाडी केली आहे. ठाणे जिल्ह्या भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी मात्र याच कोठाराला परतीच्या पावसाची दृष्ट लागली आहे. यात कल्याण तालुक्यातील शेकडो हेक्टर भाताची कापणी केलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांना ना तांदूळ, ना तनस हाती लागणार आहे.
यावर्षी भात पिकाच्या नासाडीचा फटका जनावरांच्या चाऱ्यावर देखील बसणार आहे. तसेच भिजलेली भात पिकातील तांदूळ पूर्ण पणे न निघता त्याचे तुकडे पडणार आहेत. त्यामुळे असे पीक ना खावटीस ना बाजारात विक्रीसाठी उपयोगी पडणार आहे. यामुळे खर्च झालेली मजुरी, वर्ष भराची मेहनत ही परतीच्या पावसाने अक्षरशः शेतकरी राजाकडून ओरबडून नेली आहे. पुढे वर्षभर खायच काय? हा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे.
भात पिकाशी संबंधित तूस, पेंढा, यांच्या टंचाईमुळे महागाई वाढेल अशी भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे. यामुळे कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील बळीराजा हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाने कल्याण तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असताना उत्पादनात घट येण्याचा फटका परिसरातील मीलधारकांनाही सोसावा लागणार आहे. कापणीस सुरूवात होत असताना कोसळलेल्या नैसर्गिक संकटाने भाताच्या उत्पादनात 30 ते 35 टक्के घट येण्याचा अंदाज आहे. त्याचा विपरित परिणाम भातावर प्रक्रिया करणाऱ्या राईस मीलवरही होणार आहे.
शेतकऱ्यांचा घास हिरावला जाणार...
बहुतांश तालुक्यातील गावात काढणीचे काम सुरू होण्याच्या मार्गावर होते. काहींचा शेतातून काढलेला भात खळ्यात ठेवला होता. चांगला भाव पाहून तो बाजारात नेण्याचे नियोजन सुरू होते. नेमक्या त्याच वेळी दररोज सायंकाळी परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळमूळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या वर्षी शेतीतील भात उत्पादन हे चांगले आले आहे. मात्र अवकाळी पावसाचा जोर अजूनही कमी झाला नाही. पाऊस असाच पडत राहिला तर आमच्या शेतीचे नुकसान होऊन उपासमारीची वेळ येईल. नैसर्गिक आपत्तीची भरपाई सरकारकडून मिळत नसल्याने आम्हाला कोणाचाच आधार नाही. ना धान्य ना पेंढा अशी अवस्था अवकाळी पावसामुळे करून टाकली आहे.
भरत म्हात्रे, शेतकरी