ठाणे: शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार स्कूल बसची तपासणी दरवर्षी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते.
यंदा आता पर्यंत साठ टक्के बसेसची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन सूत्रांनी दिली. तर विद्यार्थी प्रवाशी वाहतुकीची परवानगी फक्त शाळेने अधिकृत परवाना घेतलेल्या बसेसनाच देण्यात आली असुन रिक्षातील विद्यार्थी प्रवाशी वाहतूक पूर्णता अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थी वाहतुकीतील वाहन वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण राज्य शासनाने आखून नियमावली लागू केली आहे. नियमावलीमध्ये शाळेचे प्रशासन, बसचा ठेकेदार व प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शालेय बसला पिवळा रंग व चालकाकडे पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव, तसेच बिल्ला आवश्यक आहे.
बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, विद्यार्थ्यांचे थांबे आदींची माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शालेय वाहनासोबत शालेय प्रशासन व कंत्राटदार यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी सहायकाची नेमणूक करणे बंधनकारक आहे. तसेच स्कुल बस १२ वर्षांपेक्षा जुनी नसावी, असा नियम घालण्यात आला आहे.
हे सर्व नियम पूर्ण करणाऱ्या बसेसनाच विद्यर्थी वाहतूकीची परवानगी देण्यात येते. त्यानुसार हे सर्व नियम ठाण्यातील स्कूल बसेस पाळतात की नाही याची तपासणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरु केली आहे.
ठाण्यात सुमारे अडीच हजार अधिकृत स्कूल बसेस असून त्यापैकी ६० टक्के स्कूल बसेसची तपासणी पूर्ण झाली असून या बसेसला फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे. तर या बसेस मध्ये महिला अटेंडन्स असाव्यात असे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या बसेसनी प्रती तास ४० किलोमीटरचा वेग ओलांडू नयेत असे बंधनकारक केले करण्यात आले आहे.
ठाण्यात जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक संपन्न
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि धोकामुक्त व्हावा यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीची त्रैमासिक बैठक फेब्रुवारी महिन्या जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष, ठाणे शहर वाहतूक विभागाचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यावेळी पंकज शिरसाट तसेच, समितीचे सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आणि कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी विविध सुरक्षाविषयक निर्देश दिले आहेत. या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद व ठाणे महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, टीएमटी व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, केडीएमटी व्यवस्थापक, स्कूल बस चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) चे अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पोलीस तसेच अन्य प्राधिकरणे व प्रशासन, परिवहन विभाग, शाळा व्यवस्थापन, बस मालक व चालक यांनी समन्वयाने काम केल्यास शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व निर्धास्त होईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सामुहिक प्रयत्नांची शर्थ केली जाईल.- पंकज शिरसाट, उप आयुक्त, ठाणे शहर वाहतुक शाखा