कसारा (ठाणे) : श्याम धुमाळ
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागांत चालू असलेल्या एस.टी. बस सेवा एस.टी. महामंडळाने अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. कोठारे, सारंगपुरी, मुरबीचापाडा, अवकळवाडी, पोकळ्याचीवाडी, जळक्याचेवाडी या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी धसई व शहापूर येथे येतात. मात्र, बससेवा बंद झाल्याने त्यांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
मंगळवार (दि.1 जुलै) आज शाळा सुटल्यानंतर धसईकडे जाण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी शहापूरहून येणारी बस अडवून बससमोरच आंदोलन छेडले. या भागांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी दुपारी 12 वाजेची कोठारेकडे जाणारी बस महामंडळाने अचानक रद्द केली होती. यामुळे 100 हून अधिक प्रवासी शहापूर व धसई येथे अडकून पडले. दररोज 3 ते 4 फेऱ्या करणाऱ्या बस अचानक बंद केल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांचे हाल सुरू आहेत.
या संदर्भात कोठारे गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यातच शहापूर आगार प्रमुखांना बस सेवा नियमित सुरू ठेवावी म्हणून निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिणामी, आज दुपारी 1 वाजता कोठारेसाठी एकच बस सोडण्यात आली, तीही पूर्णपणे भरलेली होती. यामुळे 55-60 विद्यार्थी बसमध्ये चढू शकले नाहीत.
संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच बस आडवून आंदोलन सुरू केले. तब्बल दोन तास हे आंदोलन सुरू राहिले. यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. अखेर धसई येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गिरा आणि इतरांनी शहापूर आगाराशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. आंदोलन तीव्र होत असल्याने अखेर आगार प्रशासनाने दोन तासांनंतर कोठारेसाठी दुसरी बस पाठवली. दुसरी बस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आणि आपल्या गावी रवाना झाले.
शहापूर आगाराची उदासीनता खेदजनक - शहापूर बस आगाराने कोठारे व आजूबाजूच्या दुर्गम भागातील बस सेवा अचानक बंद करून विद्यार्थ्यांवर आणि नागरिकांवर अन्याय केला आहे. या सेवांची तातडीने पुनर्बहाली व्हावी यासाठी धसई विकास मंडळाने वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, आगार प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.रवींद्र लकडे , धसई विकास मंडळाचे अध्यक्ष