Sameer Wankhede Pudhari
ठाणे

Sameer Wankhede: 'भारत महासत्ता होऊ नये म्हणून परकीय शक्तींकडून तरुणाईला अमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा डाव'

NCB Officer Sameer Wankhede: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो माजी संचालक समीर वानखेडे यांचा कल्याण विकास फाउंडेशन, यंग इंडिया कल्याणचा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

Sameer Wankhede On Drugs Racket In India

सापाड (ठाणे) : आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पाऊले टाकत आहे. मात्र आपण महासत्ता होऊ नये यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा कट रचला जात आहे. मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारी न जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलावा असे आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो मुंबईचे माजी संचालक आयआरएस समीर वानखेडे यांनी कल्याणात केले.

कल्याण येथील माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण विकास फाउंडेशन तसेच अ‍ॅड. शिवानी कांबळे यांच्या यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमात ते बोलत होते.

यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रम राबविण्यात आला.

कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज यातून केवळ आपले शारीरिक, मानसिक नुकसान होत नाही. तर मोठ्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला हे दिसून येईल की आपल्या देशावर, देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे नकारात्मक परिणाम होत आहेत. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के जनता ही तरुण आहे. केवळ तरुणच नाहीये तर या युवा पिढीकडे देशाला महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासही आहे.

त्यामुळेच तर काही परकीय शक्तींनी या तरुण पिढीला आपल्या ध्येयापासून भरकवटण्यासाठी अंमली पदार्थांच्या व्यसनात ढकलले जात असल्याचा गंभीर आरोप समीर वानखेडे यांनी यावेळी केला. येथील के. सी. गांधी शाळेच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या या कार्यक्रमाला कल्याणातील 30-35 शाळा महाविद्यातील 9 ते तृतीय वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

शासनाकडून आणि पोलीस यंत्रणेकडून राज्यभरात अंमली पदार्थ विक्री करणार्‍यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. इतकेच नाही तर यासाठी शासनाने अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक सक्षमपणे करण्यासाठी 1933 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत असलेली माहिती या क्रमांकावर कळवल्यास त्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल आणि संबंधितावर कायदेशीर कारवाईही केली जाईल अशी माहितीही वानखेडे यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमाला केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार, यंग इंडिया कल्याणच्या अ‍ॅड. शिवानी कांबळे, श्री सदस्य यतीन चाफेकर, के. सी. गांधी शाळेचे ट्रस्टी मनोहर पालन सर यांच्यासह कल्याणातील ज्येष्ठ मंडळी, शालेय - महाविद्यालयीन शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद

समीर वानखेडे यांनी या कार्यक्रमात आपल्याकडील बाजारात कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रग्ज विक्री होते, त्यांच्याविरोधात कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाते, एखाद्याकडे ते आढळले तर कायद्याने काय शिक्षा होऊ शकते आदी प्रमुख मुद्द्यांवरही जनजागृती केली. तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी अंमली पदार्थांसंदर्भात निर्माण झालेले विविध प्रश्नही त्यांना विचारले. ज्यावर समीर वानखेडे यांनी कायदेशीर तरतुदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना उत्तरेही दिली. दरम्यान तत्पूर्वी कल्याण विकास फाउंडेशनबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तर यंग इंडिया कल्याण संस्थेबाबत अ‍ॅड. शिवानी कांबळे यांनी माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT