

Jalgaon Amphetamine Drugs Seized Case
जळगाव : चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कन्नड घाटातील बोढरे फाट्याजवळ महामार्ग पोलिसांच्या नाकाबंदीत तब्बल 64 कोटी 48 लाख रुपये किमतीचा ऍम्फेटामाइन्स (Amphetamines) हा प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आला. या कारवाईत 43 किलो वजनाचे 39 पॅकेट्स सापडले असून एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाहन सापडले
गुरुवारी (दि. 24 जुलै ) रोजी रात्री महामार्ग पोलीस नियमित नाकाबंदी करत असताना, दिल्ली पासिंग असलेली एक कार बोढरे फाटा चौकीजवळ तपासणीसाठी थांबवण्यात आली. वाहन चालकाने पोलीस कर्मचारी योगेश पवार व महेंद्र अहिरराव यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी वाहनाची कसून तपासणी केली असता डिक्कीत मोठी सूटकेस आढळली. या सुटकेसमध्ये काही पाकिटं होती.
पोलिसांकडून तत्काळ ही माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासणीत सूटकेसमध्ये ऍम्फेटामाइन्स हा अमली पदार्थ मिळून आला. या प्रकरणी अब्दुल असीम सय्यद (वय 48, रा. दिल्ली) या वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. तो दिल्लीहून बेंगळुरूकडे हा ड्रग्ज वाहतूक करत होता, अशी माहिती मिळाली आहे.
पोलिस तपासात उघड झाले की, अब्दुल असीम सय्यद (वय 48, रा. दिल्ली) याच्यावर यापूर्वी बेंगळुरूमध्येही अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल होता आणि त्यात त्याला शिक्षा देखील झाली होती. तो नुकताच तुरुंगातून सुटलेला आहे.
हे ड्रग्ज चाळीसगावमार्गे संभाजीनगरकडे का नेला जात होता? ड्रग्ज नेमकं कुठे पाठवले जात होते, यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऍम्फेटामाइन्स सापडल्यामुळे त्यावर प्रक्रिया करून वेगळा ड्रग्ज बनवण्याचा प्रयत्न सुरू होता, असा प्राथमिक संशय आहे.
यापूर्वीही जळगाव, भुसावळ परिसरात एमडी ड्रग्ज पकडण्यात आले होते, त्यामुळे या दोन्ही प्रकरणांमध्ये कोणताही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित मनेर करीत आहेत.