कल्याण : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि.२९) मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात चव्हाण हे सलग चौथ्यांदा निवडणूक लढवत असून आज त्यांनी डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौकापासून भव्य रॅली काढत आपला अर्ज दाखल केला.
या रॅलीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयसह सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी डोंबिवली शहर दणाणून सोडले होते. तर सामान्य जनता महायुती सोबत असल्यानेच महायुतीचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
डोंबिवलीकरांचा आशीर्वाद आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपा परिवाराच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे दाखल केला. 'डोंबिवली फर्स्ट' या तत्त्वाने गेल्या २०-२५ वर्षात डोंबिवली शहर आणि डोंबिवलीकर यांच्यासाठी प्रयत्न करत आलो. यापुढेही हे प्रयत्न असेच अविरत सुरू राहतील, असे वचन चव्हाण यांनी दिले.
गेल्या २०-२५ वर्षात केलेल्या डोंबिवली शहर आणि डोंबिवलीकरांच्या सेवेतून डोंबिवलीकरांशी अतूट ऋणानुबंध विणले गेले आहेत. त्याच बळावर आज डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश आणि डोंबिवलीतील विविध देवस्थानांचे दर्शन घेतल्यानंतर भव्य नामांकन रॅलीला सुरुवात झाली. संपूर्ण शहरातील हजारो डोंबिवलीकर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.