डॉ. महेश केळुसकर
स्वतःला हवी तीच आणि तशीच अभिव्यक्ती करणारे ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांनी मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्धीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने आज रविवारी, 12 एप्रिल 2026 रोजी नवी मुंबई येथे शब्दालय प्रकाशनच्या वतीने कृतज्ञता आणि गौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे या गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे तर दिनकर गांगल अध्यक्ष आहेत. सकाळी दहा वाजता नवी मुंबईच्या सिडको भवन जवळच्या भारतीय विद्या भवन येथे सकाळी दहा वाजता हे गौरव सत्र सुरू होईल आणि संपूर्ण दिवसभर रंगनाथ पठारे यांच्या समग्र साहित्याच्या विविध पैलूंवर अभ्यासक आणि तज्ज्ञ वाङ्मयकर्मींकडून चर्चा होईल.
अखंड जागरूक असलेल्या पठारे सरांचं लेखन ज्यांनी ज्यांनी वाचलेलं आहे त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल आणि ती म्हणजे या लेखकाला वाचणाऱ्यांच्या अभिप्रायांबद्दल एक प्रकारची अनास्था आणि बेपर्वाई आहे. कुणाला तरी नजरेसमोर ठेवून किंवा कुणासाठी तरी लेखन केलंय असं पठारे यांच्या साहित्यातून जाणवत नाही. ते केवळ स्वतःच्या जाणीवांशी निष्ठा ठेवून लिहितात आणि अत्यंत निकडीचे वाटल्यावरच लिहितात, असं त्यांचं साहित्य वाचल्यावर वाटतं. हेच आहे स्वतःला लिहिणं. स्वतःशिवाय या लिहिण्यात दुसरं कोणीही अभिप्रेत नाही.
एक लेखक केवळ स्वतःला, स्वतःच्या जाणिवांना आणि बुद्धीला वाटेल ते आणि तेच स्वतःच्या भाषेत व्यक्त करत राहतो हे त्यांचं अस्सल लेखकपण आहे आणि तेच दुर्मीळ आहे. चक्रव्यूह, हारणपासून सुरू झालेली ही पठारी शैली नामुष्कीचे स्वगत पर्यंत चांगलीच स्थिर झालेली आहे. अलिकडची सातपाटील कुलवृत्तान्त ही त्याचीच साक्ष आहे.
याचा अर्थ असा नव्हे की पठारे यांना वाचक नकोत किंवा ते स्वतःमध्येच मश्गुल असलेले लेखक आहेत. उलट अत्यंत तीव्र समाजभान असलेला हा लेखक ज्या पोटतिडकीनं सामाजिक प्रश्न आणि समस्यांचा गुंता उलगडण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दल आपण त्यांच्या प्रति कृतज्ञच असलं पाहिजे.
नामुष्कीचे स्वगत ही पठारे यांची एक गाजलेली कादंबरी. तीमध्ये निवेदक म्हणजे गर्भित लेखक आपल्या शैलीविषयी अधूनमधून बोलत राहतो. हे सगळे मी माझ्या पद्धतीने सांगत असताना साहजिकच ते रेंगाळत जाणाऱ्या शैलीने सांगत आहे, असं तो गर्भित लेखक म्हणतो. ही गोष्ट पुढे तो वारंवार वेगवेगळ्या निमित्तानं आणि पद्धतीनं सांगत राहतो. याचा अर्थ त्याला जे सांगायचं आहे ते शब्दात सांगूनही सगळं सांगितलंय असं समाधान न देणारं असं काहीतरी आहे म्हणून तो त्याकडे पुन्हा पुन्हा वळतो, रेंगाळत राहतो.
पुढे एके ठिकाणी, सांगायचे तर सगळे पद्धतशीर तपशीलात सांगायचे ही माझी धारणा आणि सवय, असल्याचं तो सांगतो आणि येथील तपशीलवार वर्णनाचं समर्थन करतो. आणखी एका स्थळी गंभीर शैलीतली विनोदी पेशकश असे शब्द तो वापरतो. त्याही पुढे पोषाखी पद्धतीचं किंवा समारंभाच्या शैलीचे निवेदन असा शब्दप्रयोग आलेला आहे. दीर्घ निवेदन, दीर्घ बडबड, माझ्या प्रतिपादनातील ज्ञानात्मक वा दार्शनिक भाग ,बोलण्याची शैली, सोपे विवेचन, असे वारंवार येणारे शब्दप्रयोग या कादंबरीतील निवेदनाचे वैविध्यपूर्ण स्वरूप सूचित करणारे आहेत.
अशा प्रकारचे अभिप्राय पात्रांच्या मुखांमधूनही व्यक्त होताना आढळतात. उदाहरणार्थ, तुझा दृष्टिकोन जरा चमत्कारिक असतोच तरीही तो वेधकही खासच असतो व त्यात दमही असतो व म्हणूनच मला ते ऐकण्याचा मोह वाटतो. हे पॅट्रीशियाने निवेदकाच्या निवेदनासंबंधी नोंदवलेलं मत आहे. याच्या उलट त्याच्या मुलाचं मत आहे. आपला बाप भरकटल्यासारखं काहीही बोलतो, तो बाता मारतो, प्रत्यक्षात तो कल्पनेच्या पातळीवर वावरतो आणि भ्रमांना सत्याच्या स्तरावर नेतो, असं या मुलाला वाटतं. अशा प्रकारच्या शैलीमुळे पठारे यांचं लेखन एकजिनसी न राहता बहुजिनशी होतं.
पठारे यांच्या कादंबऱ्यांमधील केंद्रवर्ती पात्र किंवा निवेदक पात्र सतत बोलत असतं. या बोलण्याला एक सातत्यपूर्ण गतीही लाभलेली असते. हे बोलणं निवेदन ही जणू काही समकालीन संवाद शून्यतेला दिलेला प्रतिसाद ठरते. टोकदार सावलीचे वर्तमानमधील कथांशाची उभारणी घटनांना मागे पुढे नेत केली गेली आहे. स्वतःचं जन्म रहस्य, आईचं पंढरपूर हे माहेर असणं, मुलींची प्रेमप्रकरणं, आई संबंधिचा संभ्रम, दर्शक प्रसंग यांची काळाच्या दृष्टीने फेरजुळणी, निवेदनाद्वारे टोकदार सावलीचे वर्तमानमध्ये येते.
चक्रव्यूह किंवा दुःखाचे शॉपदमधील केंद्रवर्ती घटना मालिका काहीशा रहस्यासारखी उलगडत नेली जाते. बाह्य विश्व, स्वचं अनुभव विश्व, संवेदन स्वभाव यांच्यातील देवघेवीतून पठारे यांच्या कादंबऱ्यांमधील निवेदनातून काळाची उलटापालट होत राहते. निवेदनात प्रथम प्रक्रियेबरोबरच काळाची गरजही होऊ लागते. वर्तमान बिंदूवर उभा असलेला टोकदार सावलीचे वर्तमानमधील निवेदक सातत्याने गतकाळातील घटनांच्या जंजाळाला समजावून घेऊ पाहतो.आपल्या लिहिण्याच्या प्रक्रियेविषयी सांगताना अनुष्टुभच्या जानेवारी-फेब्रुवारी 1999 च्या अंकात निर्मितीची गोष्ट या टिपणामध्ये रंगनाथ पठारे म्हणतात: “मला लिहिताना एकांत, आवाजरहित शांतता असं काहीही लागत नाही.
विषय डोक्यात घुसलेला असतो. तो सारं पुरवतो. तो साऱ्या अडथळ्यांवर स्वार होतो. एरवीही दुनियेत माणूस म्हणून आपण जितके असतो व दिसतो त्यापेक्षा आपल्या अंतर्मनात आपण कितीतरी जास्त असतो किंबहुना आपलं दुनियेतलं असणं आपल्यातील असण्यातला फार लहान भाग असतो. लिहिण्याच्या काळात तर बाहेरचं जग आपल्या दृष्टीने आणखीनच बिनमहत्त्वाचं होऊन जातं. त्याच्या असण्या / नसण्याचा ताप होत नाही.
”मानवी प्रवृत्ती, विकृती, मानवी वर्तन , सहजता, नैसर्गिक नियम, सहानुभूती, करुणा, समाज, राजकारण, जागतिकता, वैश्विकता, प्रादेशिकता, देशीयता, प्रेम, अस्तित्व, उपरोध इत्यादी आशयसुत्रे असलेला आजमितीचा समृद्ध ज्येष्ठ लेखक म्हणून रंगनाथ पठारे सरांनी दीर्घकाळ केलेली मराठी साहित्यातील कामगिरी अजोड आहे. खरे म्हणजे शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना सन्मानानं ,बिनविरोध देऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांचा गौरव केला पाहिजे.