Marathi Language: मराठी साहित्यात येऊ इच्छिणाऱ्या नवोदित लेखकांनी काय लक्षात ठेवावं? ज्येष्ठ साहित्यिकांनी दिला सल्ला

International Mother Language Day: भारतातील जनगणनेच्या आकडेवारीकडे पाहिले असता २०११ मध्ये १३६९ मातृभाषांची नोंद झाली होती
Maratha Language
Maratha LanguagePudhari
Published on
Updated on

अंजली राऊत

दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. १९५२ मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये उर्दूला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात बंगाली भाषिकांनी उभारलेल्या आंदोलनाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो. या चळवळीने पुढे वेग घेतला आणि अखेर बांग्लादेशाची निर्मिती झाली. त्या ऐतिहासिक आंदोलनाच्या सन्मानार्थ युनेस्काने २१ फेब्रुवारी १९९९ मध्ये हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून विविध देशांमध्ये मातृभाषांच्या जतन आणि संवर्धनासाठी उपक्रम राबवले जात आहेत.

मात्र ज्या देशातून ही चळवळ उभी राहिली, त्या बांगलादेशमध्येच या दिवसाचे महत्त्व कमी होत असल्याची चर्चा आहे. शेख मुजिबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र झालेल्या या देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे भाषेच्या प्रश्नावर नवे प्रश्न निर्माण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या वाढत्या वापरामुळे भाषांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाषेचे मोठ्या प्रमाणावर संकलित नमुने घेऊन यंत्रणांमार्फत मजकूरनिर्मिती होत असल्याने मानवी भाषिक कौशल्याचा वापर कमी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होते. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रांचे संपूर्ण अंक अल्पावधीत स्वयंचलितरीत्या तयार होऊ शकतात. अशा परिस्थितीत पत्रकार, रंगकर्मी, नाटककार आदी क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घरगुती संवाद कमी होणे, स्थलांतर वाढणे आणि रोजगाराच्या गरजांनुसार भाषा बदलणे या कारणांमुळेही मातृभाषा अडचणीत सापडत आहेत. भारतातील जनगणनेच्या आकडेवारीकडे पाहिले असता २०११ मध्ये १३६९ मातृभाषांची नोंद झाली होती. मात्र अधिकृत यादीत १२१ भाषांचाच समावेश करण्यात आला. अनेक भाषांचे एकत्रीकरण करून मर्यादित स्वरूपात सादरीकरण केल्याची टीका यावर होत आहे. आगामी जनगणनेतही असेच चित्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी साहित्यात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी....

मराठी साहित्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नवोदितांनी स्वतंत्र विचार, सामाजिक भान आणि नक्कल टाळण्याची जाणीव ठेवावी, असे मत भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. दमणकारी सत्तेविरुद्ध बोलण्याचे धाडस साहित्यिकांमध्ये असावे. संत तुकाराम आणि सानेगुरुजी यांच्यासारखे स्पष्ट आणि निर्भीड विचार मांडण्याची परंपरा जपली गेली पाहिजे, अन्यथा साहित्य केवळ करमणुकीपुरते मर्यादित राहील.

पुढील पिढीसाठी मराठीचा विस्तार व्हावा

मराठी भाषा टिकवण्यासाठी खोटा अभिमान नव्हे तर व्यवहार्य पावले आवश्यक असल्याचे मत भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी मांडले. मराठीत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्यास पालक आपसूकच मुलांना मराठी माध्यमाकडे वळवतील. आज इंग्रजी माध्यमाला प्राधान्य दिले जाते, कारण त्या भाषेत रोजगाराच्या संधी अधिक असल्याची धारणा आहे. त्यामुळे भाषेचा प्रश्न हा केवळ शिक्षणाचा नसून अर्थकारणाशी जोडलेला आहे.

डिजिटल माध्यमातील मराठी

डिजिटल क्षेत्रात मराठीची उपस्थिती वाढवणे ही काळाची गरज आहे. शाळा, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय आणि संशोधनाची वृत्ती जोपासली गेल्यास तंत्रज्ञानाच्या अग्रभागी मराठीला स्थान मिळू शकते. हा केवळ व्याकरणाचा नव्हे तर शिक्षणव्यवस्थेचा मुद्दा असल्याचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी अधोरेखित केले.

भाषासंवर्धनासाठी वैचारिकता आवश्यक

भाषेचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र विचारशैली आणि वैचारिकतेची जोपासना आवश्यक आहे. वरून आलेल्या सूचनांचे आंधळेपणाने पालन न करता चिकित्सक दृष्टी ठेवणे गरजेचे आहे. नुसत्या माना डोलावून होयबा असू नये. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांनी मराठी समाजजीवन आणि भाषेला मोठी दिशा दिली आहे. आजच्या तरुणाईनेही अशीच स्वतंत्र विचारधारा जोपासल्यास मराठी भाषा सक्षमपणे पुढील पिढीकडे पोहोचू शकते.

- डॉ. गणेश नारायणदास देवी, भाषातज्ज्ञ व साहित्यिक समीक्षक.

मातृभाषा हा भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचा उत्सव आहे. मातृभाषेच्या दैनंदिन वापरातून आपली संस्कृती, परंपरा आणि भावना जपल्या जातात. विशेषतः प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचा वापर केल्यास शिक्षणाचा पाया भक्कम होतो आणि विद्यार्थ्यांची विचारशक्ती, आत्मविश्वास व अभिव्यक्ती क्षमता वाढते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मातृभाषेला दिलेले प्राधान्य शिक्षणाला नवी दिशा देणारे ठरले आहे. बहुभाषिक आणि बहुविषयक शिक्षणपद्धतीमुळे संकल्पना अधिक प्रभावीपणे समजतात तसेच संशोधन वृत्ती, कौशल्य विकास आणि चिकित्सक विचारसरणीला चालना मिळते. भारतीय ज्ञानपद्धतीच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्यांचे आकलन होते. मातृभाषेच्या बळावर ज्ञानसंपन्न, कौशल्याधिष्ठित आणि जबाबदार पिढी घडेल व विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, याबद्दल निश्चित विश्वास वाटतो.

— डॉ. सौ. अस्मिता देशपांडे, प्राचार्या, श्री. जयरामभाई हायस्कूल, नाशिक रोड.

मातृभाषा म्हणजे आईकडून मिळालेली भाषा आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. मुलांना भाषा वाचनाची सवय लागावी म्हणून घराघरातून प्रयत्न व्हायला हवेत. वाचनातून मुलांचा भाषेचं सौंदर्य समजावून पालकांनी छान गोष्टी सांगायला पाहिजे, त्यामुळे मुलांमध्ये आवड रुजेल आणि भाषेचं काय होईल हा प्रश्नच पडणार नाही. संवाद वाचनातून कविवर्य कुसुमाग्रज, संताची परंपरा कळेल.

- प्रा. पुष्पा गवांदे, साहित्यभूषण, मराठी अध्यापक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news