Marathi language purity | मराठी भाषेचे शुद्धीकरण हवेच!

Marathi language purity |
Marathi language purity | मराठी भाषेचे शुद्धीकरण हवेच!
Published on
Updated on

मधु मंगेश कर्णिक

मधु मंगेश कर्णिक... अर्थात कांदबरीकार, ललित लेखक, नाटककार... साहित्य वा़ड़मयातील सर्व प्रकारात मुशाफिरी करणारे मधुभाई... पद्मश्री मधु मंगेश कर्णिक... वय वर्ष फक्त 95... या वयातही तल्लख स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, समाजमन आणि साहित्यावरची पकड असणारे भाई प्रत्येक कोकणवासीयांच्या गळ्यातील ताईतच. कोकणवासीयांनी आजवर त्यांचा अनेकदा गौरव केला; पण ज्या रत्नागिरीत त्यांनी आयुष्याच्या संघर्षाला सुरुवात केली, तिथे यशाची फळेही चाखली, त्याच लाल मातीच्या साक्षीने साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले. ज्या मातीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे बीज रुजवले, त्याच कोमसापचा आज वटवृक्ष झाला आहे. त्या वटवृक्षाच्या सावलीत वावरणार्‍या कोकण प्रांतातील पाचही जिल्ह्यांच्या वतीने मधुभाईंचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला. यानिमित्त ‘मराठी साहित्य’ या अनुषंगाने मधु मंगेश कर्णिक यांनी मांडलेले हे विवेचन...

मी नुकतेच पहिली ते दहावीपर्यंतचे मराठीचे पुस्तक घेऊन मुद्दाम वाचले. बालवयात जिथे भाषेचा संस्कार होतो, तिथेच आपण मराठी व्याकरणाच्या मोठ्या चुका करत आहोत. अनेक शब्द मांडताना काही गफलती करत आहोत. ‘मी पाणी पिलो, मी मूर्त्या पाहिल्या, हत्तीणींचा कळप पाहिला’ असे शब्दप्रयोग यात आहेत. हे मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे, मराठी भाषा वेडीवाकडी करून आपण मुलांसमोर नेत आहोत. मूर्तीचे अनेकवचन मूर्तीच आणि हत्तींचे अनेकवचन हत्तीच आहे, अशी शुद्ध भाषा आपण मुलांना शिकवत नाही. मराठी भाषा आणि तिचे सौंदर्य याची तोंडओळख ही बालवयात झाली हिजे. पहिलीच्या बालभारती पुस्तकात पहिली दोन पाने चित्रांची आहेत. त्यात कुठेच साहित्य दिसत नाही. साहित्य वाचून मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीने चित्रे रंगवली पाहिजेत. हा मूळ संस्कार आपण या मुलांना देत नाही. त्यामुळे मराठी भाषेचे होणारे नुकसान हे अधिक आहे.

अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळावी, यासाठी आपण अनेक दिवस लढलो. मराठी भाषा ही ज्ञानेश्वरांच्या ओव्यांची, तुकारामांच्या अभंगांची, साधुसंतांच्या सद्वचनांची अशी मधाळ भाषा आहे. नव्या पिढीला या भाषेची समज देण्यासाठी तल्लख स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता याचा वापर करून समाजमन साहित्यात आणण्यासाठी नवे लेखक तयार व्हावे लागतील. यासाठी त्यांना मराठी भाषेचे बाळकडू बालवयातच मिळाले पाहिजे आणि ते उत्तम मिळाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. मराठी भाषेची बीजे ही उत्तम रुजली पाहिजेत, यासाठी प्राथमिक शाळेपासून विद्यार्थ्यांना भाषेची गोडी निर्माण होईल, असे काम मराठी भाषा विभागाने करायला हवे. माझी पहिली कविता 14 व्या वर्षी छापून आली, तेव्हा मी हुशार विद्यार्थी नव्हतो, वांड होतो, असे म्हटले तरी चालेल. मी फारसा अभ्यास करत नव्हतो. आई आजारी होती. तिच्या हयातीतच माझी पहिली कविता छापून आली, तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. मोठा लेखक हो, असा आशीर्वाद दिला आणि मीही लेखक होणार असे स्वप्नं पाहू लागलो. माझी पहिली कथा रत्नागिरीच्या ‘रत्नाकर’ मासिकात छापून आली. तिथून माझा लेखन प्रवास सुरू झाला. मी लिहिलेले एकही पान आजवर साभार परत आले नाही. माझ्या लेखनाकडे पु. ल. देशपांडे यांचे लक्ष गेले. त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिली.

माझी अनेक पुस्तके येत गेली. त्यातील 80 पुस्तकांना त्यांचीच प्रस्तावना लाभली. मी 1990 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाले. त्यावेळी कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचे आशीर्वादरूपी पत्र आले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पु. ल. देशपांडे यांनी मला सतत पाठिंबा दिला. त्या थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो आणि तिथेच मी कोकणात अनवाणी फिरणार्‍या लेखकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रूपाने एक व्यासपीठ निर्माण केले. 1990 मध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वसंत सावंत आणि प्र. चिं. सहस्रबुद्धेे अशी दोनच मते मला मिळाली; पण बृहन्महाराष्ट्रातून मला मिळालेल्या भरघोस पाठिंब्यातून माझा साहित्याचा विचार सर्वदूर पोहोचला होता. त्या काळात पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाड्यात मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भात विदर्भ साहित्य संघ काम करत होते.

कोकणात मराठी भाषेचा प्रसार अधिक व्हावा म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचा जन्म झाला. हे करण्यामागे कोकणातही साहित्यिकांचे भाषेसाठी असलेले योगदान आणि आधुनिक मराठी कवितेचा जन्म ज्या कोकणातल्या केशवसुतांनी घातला, पत्रकारितेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी कोकणात घातला, अशा योगदान देणार्‍यांच्या भूमीत साहित्य बहरावे, त्याचा पाया मजबूत व्हावा म्हणून हक्काची परिषद निर्माण झाली. या कोकण मराठी साहित्य परिषदेचा पाया रचला गेला. त्यातून मराठी भाषेचेच काम झाले. शेवटी भाषा विस्तारणे आणि त्याचा विचार अधिक प्रगल्भतेने पुढे नेण्यासाठी विचारांची देवाणघेवाण हा महत्त्वाचा टप्पा असतो. समर्पित भावनेने समाजाप्रती निर्माण केलेला हा साहित्य जागर अनेकांच्या आयुष्यात नवा प्रकाश देणारा ठरतो. अनेकदा माणसाला ‘आज मी ब्रह्म पाहिले’ असा आत्मसाक्षात्कार होतो आणि आपलाच आत्मशोध आपण सुरू करतो. तिथे आपल्याला पैलूदार साहित्य सापडू लागते. साहित्याने समाज परिवर्तनाच्या लढ्यात अग्रणी भूमिका घेतल्याचे आपण पाहतो. साहित्य म्हणजे सद्विवेकाचा जागर आणि कृतिशीलतेचा आत्मभाव आपल्याला सापडत जातो. हे साहित्य लिहिणारी माणसे अनुभवसंपन्न असावी लागतात. हे सगळे करण्यासाठी पहिली पायरी ही शुद्ध मराठी पोहोचवणे हेच आहे, म्हणूनच पहिलीपासूनच्या पुस्तकात आमूलाग्र बदल होणे मला महत्त्वाचे वाटते.

दारिद्य्र, श्रीमंती, भावभावनांचे अनुभव सर्व माणसांजवळ असतात. प्रत्येकजण हे भावविश्व मांडू शकतो. मराठी भाषेत उत्तमोत्तम आत्मचरित्र आहेत. आपल्याकडून घडणार्‍या प्रमादांची आणि अनुभवांची शिदोरी आत्मचरित्रात असते. हे अनुभव विशुद्ध सत्याला स्पर्श करतात. तटस्थ वृत्तीने आपल्या जीवनाकडे पाहण्याचे बळ देतात. आपणच आपल्या जीवनाकडे अंतर्मुख होऊन पाहतो तेव्हा ते सत्यांशाने मांडावेसे वाटते. आत्मचरित्र ही एक कैफियत असते. मी आत्मचरित्र लिहिताना मी सांगेन ते सत्य सांगेन आणि लिहीन ते खरे लिहीन अशी एका अर्थाने न्यायालयात घेतात तशी शपथच घेतली, म्हणून तो सत्यानुभव. मी अनेक प्रकारचे साहित्य वाचले आणि त्यातून जे अनुभव आले त्याचा माझ्या द़ृष्टीने पुन्हा परिचय करून घेत काही नवे आशयघन विषय मांडले. मी आयुष्यात पाहिलेला पहिला लेखक म्हणजे साने गुरुजी. त्यांच्या भेटीने मी भारावून गेलो. त्यांनीही मला लेखक होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे मी डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकलो नाही, तर लेखक झालो. सुदैवाने माझ्या आई-वडील, गुरुजनांच्या आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने मी प्रतिभेने लिहित गेलो; पण सानेगुरुजींची वेदना मला लिहीत गेलो. मी साधे सरळ लिहीत गेलो, तुम्ही लेखक म्हणून मला स्वीकारले, मी काम करत राहिलो. यातच केशवसुत स्मारकाच्या निर्मितीचा मी ध्यास घेतला, ज्या कवीने नवकविता जन्माला घातली.

एक तुतारी द्या मज आणुनी...

फुंकीन मी जी स्व प्राणाने

भेदून टाकीन सारे गगने

असा नवविचार ज्या कवीने दिला त्या कवी केशवसुतांच्या जन्मभूमीची अवस्था मी पाहिली आणि मला शेक्सपियरची जतन केलेली वास्तू आठवली. आपल्याकडे राम गणेश गडकरी, केशवसुत, बालकवी, बाळशास्त्री जांभेकर यांच्यासारख्या मोठ्या झालेल्या माणसांचे दुर्लक्ष आठवले. या माणसांची महती कळण्यात आपण किती अभागी आहोत, याची जाणीव झाली आणि यातूनच 1996 मध्ये केशवसुतांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या स्मारकाच्या निर्मितीचा संकल्प झाला. अनेकदा समित्या नेमून काही होत नव्हते. 1966 मध्ये जन्मशताब्दी वर्षात जे झाले नाही ते 1990 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्यात मी केशवसुताच्या स्मारकासाठी आवाहन केले, वाचकांनी मदतीचा हात दिला. मी झपाटून कामाला लागलो. कोकण मराठी साहित्य परिषद आणि केशवसुतांच्या स्मारकासाठी मी तन, मन आणि धन दिले. त्यातून नव्या पिढीला केशवसुत उमजायला लागले, याचा मला आनंद दिली.

अपयशाने मला यशाकडे नेले. मला कौटुंबिक सुख मिळाले. त्यामुळे मला कौटुंबिक अपयश आले नाही; पण सार्वजनिक जीवनात मला काही ठिकाणी अपयश आले. मी लघुउद्योग महामंडळात जनरल मॅनेजर असताना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यालयातही अधिकारीही होतो. मी गावी यायचो, तेव्हा लोकांना वाटायचे माझ्याकडे नोकरी देण्याचा कारखाना आहे. लोक माझ्याकडे नोकरी मागायला यायचे. त्यामुळे मी गावात कारखाना काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही, हे एकच अपयश सार्वजनिक जीवनात मला आले. माझ्या गावातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी मी 1968 मी नाथ पै यांच्या नावाने शाळा सुरू केली. साहित्यात मला काही गोष्टी मिळाल्या, काही गोष्टी नाही मिळाल्या; पण मी संतुष्ट आहे. जे मला मिळाले, त्यात मी समाधानी आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने चळवळ केली. महाराष्ट्रातील सर्व साहित्य संस्थांच्या मार्फत आझाद मैदानावर अभिजात मराठीसाठी आंदोलन केले. 80 हजारांच्या घरात पत्रे केंद्र सरकारला पाठवली. दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणे, मुंबईत मराठी भाषा भवन या दोन्ही मागण्यांबाबत सरकारने तत्काळ अंमलबजावणी केली. मराठी भाषा भवनाचे काम लवकरच पूर्ण होईल. शालेय अभ्यासक्रमात पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात साहित्याचा मजकूर नाही. त्यात चित्रांचा अधिक भरणा आहे. साहित्य वाचून मुले मनातल्या मनात चित्रे रंगवतात; मात्र पुस्तकात जास्त चित्रेच असल्याने न मुलांची कल्पनाशक्ती खुंटते. मुलांच्या कल्पनाशक्तीला मोकळं सोडा. कारण, ती अफाट विचार करतात. त्यामुळे मुलांच्या पाठ्यपुस्तकात साहित्याचा मजकूर अधिक असावा. सध्या मराठी भाषेत व्याकरणद़ृष्ट्या चुकीच्या शब्दांचा वापर समाजमाध्यमांमध्ये होतो. त्यामुळे लोकही तसेच बोलतात. त्यामुळे सरकारने मराठी भाषेचे शुद्धीकरण, प्रमाणीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कोकणात बारा - तेरा बोली भाषा आहेत. त्या बोलींतून प्रमाण मराठी भाषा आणली पाहिजे. प्रमाण भाषा अधिकाधिक शुद्ध झाली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news