डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागाने ४ ऑगस्ट रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांसह मोठ्या जनावरांचे कत्तलखाने, तसेच मांसाची विक्री करणाऱ्या खाटीक/कसाई व अधिकृत परवानाधारकांना स्वातंत्र्यदिनी बंदीचा निर्णय घेतल्याचा फतवा काढला आहे. या फतव्यावर टाकलेल्या तारखेमुळे घोळ झाला आहे. या तारखेवरून गतिमान प्रशासनाची खिल्ली उडविण्यात आली आहे.
आमच्या केडीएमसीला मांसाहार बंदीचा फतवा काढायची किती घाई झालीय हे तारीख बघितली की लगेच कळते. हे पत्र काढायला असे नक्की कोणी सांगितले की ज्यांचा आदेश पडू नये म्हणून चक्क २०२६ मध्ये जाऊन पोहोचले ? अती घाई २०२६ मधे नेई....! अशा शब्दांत माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.
तर दुसरीकडे समाज माध्यमांवर जागरूक नेटकऱ्यांनी देखिल प्रशासनाचा अतीजलद कारभार चव्हाट्यावर आणला आहे. २०२५ च्या १५ ऑगस्टला मांस/मटण विक्रीला बंदी नसून पुढल्या वर्षी २०२६ च्या १५ ऑगस्टला बंदी आहे. तरीही आयुक्त महोदय एक वर्ष आगोदर पत्रकार परिषद घेतात. क्या बात है ! याला म्हणतात गतिमान प्रशासन ! असा टोला सुधीर बासरे यांनी लगावला आहे.
केडीएमसीच्या या परिपत्रकात नमूद केलेल्या तारखेची चूक लक्षात आल्यानंतर बाजार परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी टाईप केलेली ०४/०८/२०२६ ही तारीख खाडाखोड करून त्याजागी ०४/०८/२०२५ लिहून सदर परिपत्रक प्रसारित केले आहे. टायपिंग मिस्टेकचा हा घोळ चगळायला जागरूक नेटकऱ्यांना मात्र नामी संधी मिळाली आहे.