Political News Pudhari
ठाणे

Raju Patil MNS : ‘अडीच वर्षांनी पुन्हा आमदार होणार’ : मनसे नेते राजू पाटील यांचा मोठा दावा

पुढारी वृत्तसेवा

  • ‘२०२४ मध्ये बोगस मतदान झाले’, राजू पाटील यांचा गंभीर आरोप

  • मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा ‘घरवापसी’

नेवाळी : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केल्याने कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत रविवारी हा पक्षप्रवेश पार पडला. या घरवापसीमुळे स्थानिक पातळीवर भाजपला राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, ‘अडीच वर्षांत मी पुन्हा आमदार होणार’, असा दावा करत राजू पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर गंभीर संशय व्यक्त केला. “२०२४ मध्ये बोगस मतदान झाले, हे आम्हाला समजत होते; मात्र त्यावेळी काही करता आले नाही आणि ते पकडताही आले नाही,” असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आगामी काळासाठी मार्गदर्शन करताना त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादीशी संबंधित ‘एसआरए’ प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. मतदार यादीतील नोंदी बारकाईने तपासणे, योग्य मतदारांची नोंदणी सुनिश्चित करणे आणि संघटना मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य करताना त्यांनी “अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आमदार होणार,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच भाजपवासी झालेल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतल्याने मनसेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT