Dombivli News : लोढा हेवनमधील बेकायदा आठवडी बाजारावर केडीएमसीचा बुलडोझर; विरोध करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल

अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न अन् पोलिसांचा हस्तक्षेप!
dombivli news
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्याच्या महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत 'ई' प्रभाग क्षेत्रातील निळजे येथील लोढा हेवनमधील ग्रीन पार्क टॉवरच्या मागील बाजूस दर शुक्रवारी भरणाऱ्या बेकायदा आठवडी बाजारावर महापालिकेच्या पथकाने कारवाई करत बाजार उद्ध्वस्त केला.

तर दुसरीकडे शासकीय कामात अडथळा आणणे, विरोध करणे आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी बाजार भरवणाऱ्या आयोजकांसह जागामालक राजा पाटील याच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांच्या आधिपत्याखाली मुख्यालयातील फेरीवाला नियंत्रण पथक आणि 'ई' प्रभागातील फेरीवाला पथकाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान बाजारातील फेरीवाले आणि जागामालक राजा पाटील यांनी महापालिका पथकाला तीव्र विरोध केला.

शासकीय कामात अडथळा निर्माण करत जमावाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच काहींनी अंगावर वाहन घालण्याचाही प्रयत्न केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. अखेर पोलिसांच्या सहकार्याने हा विरोध मोडून काढत सदर बेकायदा आठवडी बाजार पूर्णपणे बंद करण्यात आला व संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला.

यापुढे कठोर कारवाईचा बडगा

दरम्यान, कारवाईच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आठवडी बाजारांवर यापुढेही नियमानुसार धडक मोहीम सुरूच राहणार असून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news