Kalyan News : ‘मला आजीकडे जायचंय’, गावी जाण्याच्या हट्टापायी १२ वर्षीय मुलगी बेपत्ता; सुदैवाने अनर्थ टळला

पोलिसांच्या सतर्कतेने लेक पुन्हा आईच्या कुशीत
Kalyan Missing Girl News
Published on
Updated on

डोंबिवली : खाऊ आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडून गावी जाण्याच्या ओढीने थेट रेल्वे स्थानक गाठलेल्या १२ वर्षीय मुलीला अवघ्या काही तासांत सुखरूप शोधून काढण्यात मानपाडा आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. कल्याण पूर्वेकडील पिसवली परिसरातून बेपत्ता झालेल्या या मुलीला शुक्रवारी पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

कल्याण-मलंगगड रस्त्यावरील आडीवली-ढोकळी परिसरात सुचिता अश्रू ठोके या कुटुंबासह राहतात. त्यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील माहेरखेडा हे आहे. त्यांची १२ वर्षीय मुलगी आरुषी लहानपणापासून गावी आजीकडेच राहत असे. जुलै महिन्यामध्ये तिला पुढील शिक्षणासाठी कल्याणला आणण्यात आले होते. मात्र तिचे कल्याणमध्ये मन रमत नव्हते आणि ती सतत गावी जाण्याचा हट्ट करत असल्याचे पालकांनी सांगितले. गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आरुषीने आईकडून खाऊसाठी १० रुपये घेतले आणि दुकानात जाते असे सांगून घराबाहेर पडली.

बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने पालकांनी पिसवली, मलंगगड रस्ता, तसेच कल्याण रेल्वे व एसटी स्थानक परिसरात तिचा शोध घेतला. मात्र आरुषी कुठेही न सापडल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून आई सुचिता यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच मानपाडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपास सुरू केला.

दरम्यान, आरुषी घराबाहेर पडल्यानंतर थेट कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचली होती. स्थानकावर एकटीच संशयास्पद स्थितीत फिरत असताना ती कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी तातडीने तिला ताब्यात घेतले. तपासादरम्यान सदर मुलगी लोहमार्ग पोलिसांकडे असल्याची माहिती मिळताच, दोन्ही पोलीस ठाण्यांतील पथकांच्या समन्वयाने शुक्रवारी तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपली मुलगी काही तासांतच सुखरूप मिळाल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. तक्रारीची तात्काळ दखल घेत मुलीचा शोध घेतल्याबद्दल आरुषीच्या पालकांनी मानपाडा आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news