कल्याणः बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरील ईदगाह येथे मुस्लिम समाज नमाज अदा करतो. त्या वेळेत किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरातील दर्शन हिंदू भाविकांसाठी बंद ठेवले जाते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिसांकडून मंदिरातील घंटा दोरीने बांधली जाते.
नमाजाच्या वेळेतही मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश मिळावा, दर्शनावरील निर्बंध काढावेत या मागणीसाठी गुरुवारी सकाळी कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरात शिवसैनिकांनी जोरदार घंटानाद आंदोलन केले. शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले.
या आंदोलनात कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, भिवंडी भागातून शिवसैनिक आले होते. हे आंदोलन गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या आंदोलनाची सुरुवात केली. दिघे यांच्या निधनानंतर तत्कालीन जिल्हाप्रमुख तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने परंपरा सुरू राहिली.
आजही हिंदू भाविकांच्या हक्कासाठी बकरी ईदला शिवसैनिक हे आंदोलन करतात. अनुचित प्रकार घडू नये म्हणून लालचौकी आणि दुर्गाडी किल्ला परिसरात 200 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. गुरुवारी सकाळी शिवाजी चौकात जमलेले शिवसैनिक पायी लालचौकी येथे आले. दुर्गाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी अडथळे उभारले होते.
काही आक्रमक शिवसैनिक अडथळे ओलांडून किल्ल्याच्या दिशेने जाऊ लागले. काही कार्यकर्ते उडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना रोखून धरले. नमाज सुरू असताना एकही शिवसैनिक दुर्गाडीच्या दिशेने जाणार नाही याची काळजी घेतली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती.
नमाज शांततेत पार पडल्यानंतर पोलिसांनी दुर्गादेवी मंदिर हिंदू भाविकांसाठी खुले केले. दुर्गाडी किल्ला आमच्या हक्काचा...अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. शुभ्र कुर्ता, सदरा आणि भगव्या टोप्या घातलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.
स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, हिंदू संघटनांचे नेते आंदोलनाचे नेतृत्व करत होते. आंदोलक हटत नसल्याने पोलिसांनी प्रमुख नेत्यांसह अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. आक्रमक कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी रात्रीपासूनच पाळत ठेवली होती.