

रोहा: जानेवारी ते मे 2026 या कालावधीत वातानुकूलित उपनगरी गाडीने 1.50 कोटी प्रवाशांना सेवा, मिळाली आहे. दररोज सरासरी 1.30 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरी सेवांमध्ये 26 जानेवारी ते 20 मे 2026 या कालावधीत, 2025 च्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे, जी मुंबईतील वातानुकूलित उपनगरीय प्रवासाची वाढती लोकप्रियता अधोरेखित करते.
या कालावधीतील वातानुकूलित उपनगरी सेवांच्या आकडेवारीनुसार, 2026 मध्ये प्रति सेवेमागे सरासरी 1664 प्रवाशांनी प्रवास केला, जो 2025 मधील प्रति सेवेमागे सरासरी 1474 प्रवाशांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे.
हे प्रति सेवेमागे प्रवास करणाऱ्या सरासरी प्रवासी संख्येत 12.9% वाढ दर्शवते.प्रवाशांच्या संख्येत झालेली ही वाढ सेवांमध्ये झालेल्या भरीव वाढीसोबतच साध्य झाली आहे. मध्य रेल्वेने 26 जानेवारी ते 20 मे 2026 या कालावधीत 8,991 वातानुकूलित लोकल सेवा चालवल्या, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील 6,834 सेवांच्या तुलनेत 31.6% नी अधिक आहे.सेवांमध्ये झालेल्या वाढीमुळे, दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या 2025 मधील 87,596 वरून 2026 मध्ये 1,30,075 पर्यंत वाढली, जी 48.5% ची वाढ आहे.
प्रवासी संख्या देखील 2025 मधील 1,474 वरून 2026 मध्ये 1,664 पर्यंत सुधारली आहे, जे दर्शवते की अधिक सेवा सुरू असूनही गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत.या कालावधीत प्रवास केलेल्या एकूण प्रवाशांची संख्या 2025 मधील 1.00 कोटीवरून 2026 मध्ये 1.50 कोटी झाली, जी 50% वाढ आहे.
महसूलातही विक्रमी वाढ
दैनंदिन सरासरी महसूल 2025 मधील 38.50 लाखांवरून 2026 मध्ये 56.00 लाखांपर्यंत वाढला, तर याच कालावधीतील एकूण महसूल मागील वर्षीच्या 44.27 कोटी रुपयांच्या तुलनेत 64.40 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मे 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण/बदलापूर/टिटवाळा मेन मार्गावर सेवा सुरू झाल्याने मध्य रेल्वेवरील वातानुकूलित उपनगरी सेवांची संख्या 66 वरून 80 पर्यंत वाढली.
26 जानेवारी 2026 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विभागात वातानुकूलित उपनगरी सेवा सुरू झाल्याने वातानुकूलित उपनगरी सेवांची एकूण संख्या 94 झाली आणि मे 2026 पासून आणखी 14 सेवांची भर पडल्याने मध्य रेल्वेवरील एकूण वातानुकूलित उपनगरी सेवांची संख्या 108 झाली आहे.