

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील रिक्षाचालक, टॅक्सी चालकांना मराठी बोलता, येणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात रिक्षाचालकांना मराठी बोलता येते की नाही याची तपासणी सुरू असून, ज्यांना मराठी बोलता येत नाही अशा रिक्षा, टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टनंतर मराठीचे धडे देण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील रिक्षाचालकांची मराठी भाषेवरील पकड तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत चालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना मराठीत प्रश्न विचारले जात आहेत. तसेच प्रवाशांसोबत संवाद कसा साधतात, याचीही पडताळणी केली जात आहे. १ मे पासून ही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. २८ मे पर्यंत सुमारे १ हजार ३५ रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्हाभरात सुमारे ३० हजारांपेक्षाही जास्त रिक्षाचालक आहेत. यांच्या तपासणीसाठी अवघे अडीच महिनेच शिल्लक राहिल्याने ही तपासणी मोहीम वेगाने राबवण्यात येणार असल्याचीही माहिती काठोळे यांनी दिली.
मराठी न येणारा एक जण मिळाला
शहरातील रिक्षाचालकांत मराठी बोलणाऱ्यांचा बोलबोला आहे. या २८ दिवसांच्या तपासणीत केवळ एक रिक्षाचालक असा मिळाला त्याला मराठी येत नाही. त्याला १५ तारखेपर्यंत मराठी शिकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर मात्र याच्यासह इतर मराठी न जाणणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मात्र स्वतंत्र वर्ग घेऊन मराठीचे धडे देण्यात येणार आहेत. यासाठी एका सहायक परिवहन अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केल्याची माहिती काठोळे यांनी दिली.