ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर दहा दिवस पोलिसांना चकवा देत फरार झालेले संतोष ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू या दोघांना प्रयागराज येथून अटक करण्यात आली.
सुमारे १,५४५ किलोमीटरचा माग काढत पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या. हत्येच्या दिवशी संतोष टल्लीसोबत हेल्मेट घालून आलेला अनोळखी आरोपी म्हणजेच पपलू असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर हेल्मेटधारी आरोपीची ओळख पटविणे आणि त्याचा माग काढणे हे मोठे आव्हान होते. या आरोपीचे नाव अमित सिंग ऊर्फ पपलू असल्याचे समोर आले. तो मिरा-भाईंदर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.
हत्येनंतर आरोपींनी ठाणे परिसरातून पळ काढत रायगडमार्गे उत्तर प्रदेश गाठले. पोलिसांनी त्यांचा माग काढत प्रयागराज येथे धडक दिली आणि दोघांना ताब्यात घेतले. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसाठी संतोष टल्ली आणि पप्या शिंदे यांनी शस्त्रे आणि वाहनाची व्यवस्था केली असावी.
या दोघांच्या अटकेमुळे पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. हत्येचा कट कुठे शिजला, मुख्य सूत्रधार कोण या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना अद्याप मिळवायची आहेत.