Pradeep Purneakar Murder Ram Purneakar Pudhari
ठाणे

Pradeep Purneakar Murder: 'माझ्या वडिलांच्या हत्येमागे...', प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी मुलाचा मोठा दावा; राजेंद्र शिंदेंवर गंभीर आरोप

Pradeep Purneakar Murder: ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप उर्फ बाळू पुर्णेकर यांची कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Rahul Shelke

Pradeep Purneakar Murder: ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप उर्फ बाळू पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मानपाडा परिसरातील त्यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला. हेल्मेट घातलेल्या दोन हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून पुर्णेकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात पुर्णेकर यांना दोन गोळ्या लागल्या. त्यापैकी एक गोळी छातीत, तर दुसरी मांडीला लागली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कार्यालयात घुसून गोळीबार

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये दोन व्यक्ती दुचाकीवरून पुर्णेकर यांच्या कार्यालयाजवळ येताना दिसत आहेत. दोघांनीही हेल्मेट घातले होते. कार्यालयात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुर्णेकर यांच्यावर गोळीबार केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी एकूण चार राऊंड फायर केले. त्यापैकी दोन गोळ्या पुर्णेकर यांना लागल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची माहितीही समोर आली आहे.

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी पाच संशयित आरोपींची ओळख पटवली असून त्यापैकी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पप्या शिंदे आणि आकाश निमसे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस करत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते आणि या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाचे गंभीर आरोप

दरम्यान, प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाने राम पुर्णेकरने मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांकडून आपल्या वडिलांना यापूर्वी धमकी देण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच राजेंद्र शिंदे यांनीच हत्या घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पुर्णेकर यांच्या मुलाने सांगितले की, गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी राजेंद्र शिंदे आणि काही संशयित व्यक्ती नीलकंठ ग्रीन्स परिसरात एकत्र असल्याचे त्यांनी पाहिले होते. या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. पुर्णेकर यांच्या मुलाने वडिलांना न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

परिसरातील दुकाने आणि शाळा बंद

हत्येच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच दोन शाळाही बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, पुर्णेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह ठाण्यात आणला जाणार आहे. पोलिसांकडून उर्वरित संशयित आरोपींचा शोध घेतला जात असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT