ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पुर्णेकर यांच्यावर ठाण्यात मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मनोरमानगर परिसरातील आर मॉलजवळ पुर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायर करण्यात आले. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत पुर्णेकर यांना तातडीने जवळच्या इन्फिनिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पुर्णेकर हे मंगळवारी रात्री आर मॉलजवळून जात असताना हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केले. हल्लेखोरांनी अचानक दोन राऊंड गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यातली एक गोळी त्यांच्या छातीत तर दुसरी गोळी त्यांच्या मांडीत घुसली. गोळीबार केल्यानंतर मारेकऱ्यांना धारदार हत्याने देखील पुर्णेकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आरडाओरड केल्यानंतर मारेकरी घटनस्थळावरून फरार झाले. गोळी लागून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुर्णेकर यांना स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तातडीने आर मॉलजवळील इन्फिनीटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, जखम खोल असल्याने आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांसह ठाणे गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात असून हल्लेखोर कोणत्या दिशेने आले आणि गोळीबारानंतर कोणत्या मार्गाने पसार झाले, याची माहिती घेतली जात आहे. हल्लेखोरांनी चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. तसेच घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे कामही सुरू होते. घटनास्थळी आणि रुग्णालय परिसरात कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनीही बंदोबस्त वाढविला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पोलिसांचा तपास सुरू होता.
दरम्यान, ठाणे महापालिका निवडणुकीत मनोरमा नगर भागातील प्रभाग क्रमांक : 3 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख असलेल्या प्रदीप पुर्णेकर यांच्या पत्नी विजेता पुर्णेकर आणि बंधू जयनाथ पुर्णेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तसेच प्रदीप यांचे बंधू जयनाथ ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. माजी खासदार राजन विचारे यांचे निकटवर्तीय अशी प्रदीप पुर्णेकर यांची ओळख आहे.
गोळीबाराच्या आधी आंदोलनाची केली होती तयारी
प्रदीप पुर्णेकर हे मानपाडा आणि मनोरमानगर परिसरातील नागरी प्रश्नांवर तसेच अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर आवाज उठवत होते. 'एकता गाव बचाव कृती समिती'च्या माध्यमातून त्यांनी परिसरातील एका अनधिकृत पार्किंग टॉवरविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली होती. या प्रश्नावर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि हत्येचा काही संबंध आहे का, या दिशेनेही तपासाची शक्यता आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.