Dombivli crime pudhari photo
ठाणे

Dombivli crime : इराणी काबिल्यात पोलिसांचा पहाटे ‘सर्जिकल स्ट्राईक’!

मोस्ट वॉन्टेड तिघे जाळ्यात; ८ लाखांचा एमडी जप्त, दोन ‘डेंजर’ महिलांचाही समावेश

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या इराणी काबिल्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास घुसून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन फत्ते केले. या ऑपरेशनमध्ये अमली पदार्थ विरोधी गुन्ह्यातील ३ मोस्ट वॉन्टेड असलेल्या बदमाशांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत ८ लाख रूपये किंमतीचा ८० ग्रॅम मॅफेड्रॉन म्हणजेच एमडी हा अमली पदार्थ देखील जप्त केला आहे.

परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बुधवारी पहाटेच्या सुमारास ५ पथकांनी इराणी काबिल्याला चहोबाजूंनी वेढा दिला. संपूर्ण इराणी काबिला गाढ झोपेत असतानाच पोलिसांनी प्रत्येक घराची झडती सुरू केली. या कारवाई दरम्यान वेगवेगळ्या घरांमध्ये पोलिसांना ३ जण संशयास्पदरित्या आढळून आले.

पोलिसांनी शिताफीने आहे त्या स्थितीत तिघांच्या जागीच मुसक्या आवळल्या. एरव्ही काबिल्यात घुसलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक करून जीवघेणे हल्ले करण्यात तरबेज असलेल्या इराण्यांची यावेळी मात्र डाळ शिजली नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी शमा तेहजीब इराणी (३८, रा. पाटील नगर आंबिवली) हिच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह लोहमार्ग पोलिस ठाण्यात रेल्वे ॲक्ट कायद्याच्या कलम ११४, ११० आणि क्रिमीनल अमेंडमेंट कायद्याच्या कलम ७ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

दुसरा आरोपी मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख (३५, रा. आंबिवली) याच्याकडूनच ८ लाख रूपये किंमतीचा ८० ग्रॅम वजनाचा एमडी जप्त करण्यात आला. त्याच्या विरोधात कुळगाव पोलिस ठाण्यासह ठाणे ग्रामीण, वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत. जाफरीच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.

कल्याण न्यायालयाने त्याला १४ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच जाफरीच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गैर कायदेशीर मंडळी जमा करून गुन्हा करणे, मालमत्ते संबंधातील चोरी फसवणूक, जबरी चोरी असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. तिसरी आरोपी नफिसा हाश्मी इराणी (३३, रा. इराणी वस्ती आंबिवली) हिच्यावर मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह मोक्का कायद्याच्या कलम ३ (१) (२), ३ (२), ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्याने काबिल्याला घेरलं

ही संपूर्ण कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनानुसार खडकपाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र खेडकर, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे, महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम परदेशी, कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगारे, पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, तसेच पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकासह तिन्ही पोलिस ठाण्यांतील एकूण १७ पोलिस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील ४९ पुरूष व महिला अंमलदार सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT