कल्याण : शहापूर तालुक्यातील साकडबाव भात खरेदी केंद्रावर दीड कोटी रुपयांचा घोटाळ्यातील आरोपी हरीष बुधा दरोडा याचा उपचारादरम्यान काल गुरुवारी ठाणे सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तो आमदार दौलत दरोडा याचा पुतण्या होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भात खरेदी केंद्रावर दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली किन्हवली पोलीस ठाण्यात हरीश दरोडा यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला 11 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. हरीष दरोडा हा कल्याण आधारवाडी मध्यवर्ती कारागृहात होता.
18 डिसेंबर रोजी त्याला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला. कारागृहातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हरीष दरोडा याला उपचारासाठी ठाणे येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. 18 डिसेंबर पासून हरीश दरोडा याच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. पोलिसांनी हरीष दरोडा याच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. हरीष दरोडा याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असला तरी त्यांच्या मृत्यू कशामुळे झाला याचे कारण त्याचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर समजणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे.