Kalyan Open Drains Pudhari
ठाणे

Kalyan Open Drains: कल्याणमध्ये रस्त्यावरील नाल्याची झाकणे उघडी; नागरिकांची सुरक्षितता रामभरोसे

आरोग्याचा प्रश्नही गंभीर, तातडीने उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कल्याण: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्यासमोरच महापालिकेचा कर्मचारी मॅनहोल मध्ये पडल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये देखील भर पावसाळ्यात फुटपाथ वरील गटारी उघड्या पडल्याचे दिसत आहे.

पावसाळा तोंडावर आलेला असताना देखील महापालिका उघड्या गटारी कडे दुर्लक्ष करीत आहे. काही ठिकाणी गटारीची झाकणे तुटून आत पडलेली दिसत असून बहुतांश ठिकाणी गायब झालेली दिसत आहेत.

गटारीला झाकणेच नसल्याने पूर्ण कचरा पिशवीमध्ये भरलेला व गटारी मध्ये अडकलेला दिसत असून पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, काचांचे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या असं असंख्य गोष्टी अडकून पडल्या आहेत.

महापालिका कर्मचाऱ्यांनी काय सफाई केली हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. आधीच फेरीवाले, दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केल्याने व रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना पायी चालण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

फुटपाथ वरून चालायचे झाल्यास या उघड्या गटारीमध्ये पडून दुर्घटना होण्याची शक्यता वाढली असून पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येऊन बैठ्या घरामध्ये घुसून रोगराई पसरवणार. त्यामुळे प्रशासन याचा गांभीर्याने विचार का करीत नाही हा चर्चेचा विषय झाला आहे.

आमच्या सोसायटीतील ड्रेनेज लाईन तर कायम चोकअप असते. पुढे गटारी तुंबल्यामुळे पाणी पुढे जात नाही. उलट सर्व घाण मागे येऊन तळमजल्यातील घरांच्या बाथरूम मध्ये जाते, असे अनेक वेळा झाले आहे. महापालिकडे तक्रार करून काही उपयोग होत नाही. मागील वेळेस माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्वखर्चाने हे काम आम्हाला करून दिले आहे. परंतु ते तात्पुरते स्वरूपाचे असून आता पावसाळ्यामध्ये गटारी तुंबणार आणि पुन्हा घाण पाणी तळमजल्यातील नागरिकांच्या बाथरूम मध्ये जाणार त्यामुळे महापालिकेने यावर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
- राकेश बाकळे, सेक्रेटरी प्रथमेश को-ऑप .हौ. सोसा.कल्याण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT