Thane Accident News : नगर महामार्गावर भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर File Photo
ठाणे

Thane Accident News : नगर महामार्गावर भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर

ग्रामस्थ - पोलिसांत धुमश्चक्री, घाटात येणाऱ्या पर्यटकांची हुल्लडबाजी, ५८ जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

One dead, two seriously injured in horrific accident on Nagar highway

मुरबाड : श्याम राऊत

कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर सततच्या अपघातात कित्येकांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र शनिवारी आवळीचीवाडी येथे माळशेज घाटात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाची स्थानिक तरुणांच्या वाहनाला धडक बसून एक जागीच ठार झाला, तर दोन गंभीर झाल्याने या गावातील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

घटनास्थळी टोकावडे पोलीस दाखल झाले. परंतु नागरिकांचा संताप अनावर होत पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाची झाली, अपघात घडवून आणलेल्या पर्यटकांना आमच्या ताब्यात द्या, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. टोकावडे पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या पाहता रहिवाशांना आवर घालणे कठीण असल्याने, किन्हवली, मुरबाड, बदलापूर, कल्याण येथून अतिरिक्त पोलीसांची फौज मागविण्यात आली होती.

पावसाळ्यात माळशेज घाट हा पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ असून कल्याण ठाणे मुंबई पासून तर पुणे जिल्ह्यातील आळेफाटा, नारायणराव, ओतून इत्यादी ठिकाणाहून पर्यटक येत असतात. मात्र काही पर्यटकांमुळे या पर्यटन स्थानाला गालबोट लागते. या ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई असली तरी पोलिसांची नजर चुकवून किंवा पोलिसांशी सलगी करून मद्यपान केले जाते. अशा पर्यटकांकडून घाटात धागडधिंगाणा घालणे, परतीला निघाल्यावर बेशिस्त वाहन चालवणे, अशा प्रकारामुळे अपघात घडून कोणाच्या तरी जीवावर बेतते.

अशीच घटना शनिवारी २१ रोजी मुंबईहून माळशेज घाटात आलेले पर्यटक परतीचा प्रवास करताना आवळीची वाडी येथील वळणावर घडली. त्यांच्या चारचाकी वाहनाने त्याच गावातील खंडू मेंगाळ, गणेश नवसू, भला, दिनेश नवसू शिंगवा यांना चिरडले. यात खंडू मेंगाळ ठार झाला, तर गणेश भला व दिनेश शिंगडा हे गंभीर झाल्याने गावातील नागरिकांनी रस्त्यावर येत आंदोलन छेडले.

गावातील लोकांनी यात सामील होत कल्याण नगर राष्ट्रीय महामार्ग बंद केला, जमावाला पांगविण्यासाठी टोकावडे पोलिसांचे पथक उपस्थित होते. मात्र त्यांच्यावर ग्रामस्थांनी हल्ला केला. यात काही पोलीस जखमी झाले आहेत. रहिवाशांचा उद्रेक इतका होता की त्यानी त्या पर्यटकांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जोर लावून धरली. जमावाचे रौद्ररूप पाहून टोकावडे पोलिसांनी त्या पर्यटकांना सुरक्षा दिल्याने जमाव आणखी आक्रमक झाला.

शेवटी टोकावडे पोलिसांचे बळ कमी पडताच, मुरबाड, बदलापूर, किन्हवली, कल्याण, ठाणे येथून अतिरिक्त टिम मागवण्यात आली होती. या आंदोलनात काही ग्रामस्थ देखील जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, हल्ला करणाऱ्या रहिवाशावर टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात काही महीलांचा देखील समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास टोकावडे पोलीस करीत असून पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉ. डी. एस. स्वामी यांनी टोकावडे पोलीस ठाण्यात व आवळीचीवाडी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

जमावाकडून पोलिसांवर हल्ला; ५८ जणांवर गुन्हा दाखल, २६ अटक

माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील आवळ्याची वाडी येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातात स्थानिक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. तर अन्य दोन गंभीर जखमी असल्याची वार्ता आहे. यावेळी घटनास्थळी स्थानिकांनी जमाव करून रस्ता रोको केला होता. त्यामुळे अवघ्या काही तासांतच महामार्गावर चक्काजाम होऊन मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

या घटनेला हिंसक वळण लागून संतप्त जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सबब सदर महामार्गावर शनिवारी रात्रीपासून मोठा पोलिसी फौजफाटा बंदोबस्त कामी तैनात करण्यात आला आहे. परिणामी माळशेज घाट परिक्षेत्रातील खेडोपाड्यांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे समजते. याप्रकरणी ५८ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पैकी २६ जणांना अटक करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT