नीलगायींमुळे किन्हवली परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. Pudhari News Network
ठाणे

Nilgai, The Largest Antelope : नीलगायींचे कळप उठले शेतीच्या मुळावर

Thane News : शेतकर्‍यांची नुकसानभरपाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

किन्हवली (ठाणे) : शेतातील तयार रोपांची नासधूस करणार्‍या नीलगायींमुळे किन्हवली परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. नीलगाईंचे कळप आता शेतीच्या मुळावर उठले असून या बेसुमार वाढलेल्या नीलगायींच्या कळपांना आळा घालण्यासाठी वनविभागाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

सध्या भात लावणीचा हंगाम सुरू असून किन्हवली परिसरातील शेतकर्‍यांसमोर रानातील नीलगायींपासून शेताचे रक्षण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भात लावणी केलेल्या उभ्या शेतात नीलगायींचे कळप हैदोस घालून नुकसान करत आहेत. आधीच दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला नीलगायींपासून होत असलेले हे नुकसान परवडणारे नसल्याने वन विभागाने नीलगायींचा बंदोबस्त करून नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

महाराष्ट्र शासनाने कुर्‍हाड बंदी केल्यामुळे राखीव वनक्षेत्रासह खासगी जागेतही मोठ्या प्रमाणात वनसंपदा वाढलेली दिसून येत आहे. परिणामी डुक्कर, नीलगाय या वन्यप्राण्यांची संख्याही वाढली असून गावाशेजारी येणार्‍या नीलगायींनी आपला मोर्चा शेतपिकांकडे वळवल्याचे पाहावयास मिळत आहे.

किन्हवली परिसरातील लवले, मळेगाव, मानेखिंड, आपटे, आष्टे, आदिवली, टाकीपठार, नांदगाव, वेहळोली, बर्डेपाडा, शिरवंजे या गावांच्या हद्दीतील जंगलात नीलगायींचा वावर वाढला आहे. येथील शेतकर्‍यांना त्यांचा वर्षभर त्रास सहन करावा लागत असून नीलगायींचे कळप रब्बी व खरीप अशा दोन्ही पिकांचा फडशा पाडत आहेत.

नीलगायींचा भाताच्या रोपांकडे मोर्चा

यावर्षी नीलगायींनी आपला मोर्चा भाताच्या रोपांकडे वळवला आहे. रोज पंधरा ते वीस नीलगायींचे कळप शेतात घुसून रोपे खाणे, रोपे उपटून काढणे, पायांनी तुडवणे असे नुकसान करत आहेत. दुबार पेरणीचे संकट, बियाणे-खतांचे वाढलेले दर, मजुरांची वानवा आणि यांत्रिकी शेतीमुळे वाढलेला खर्च यांचा परिणाम म्हणून शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन आधीच ढासळले आहे. त्यात वन्यप्राण्यांनी सुरू केलेले हे अतिक्रमण शेतकर्‍याला उद्ध्वस्त करत आहे. वनविभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवून नीलगायींचा बंदोबस्त करावा व भरीव स्वरूपाच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकरी नरेश देशमुख यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT