

जळगाव : जळगाव जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हिरवळ पसरलेली असताना भुसावळ शहरातील आरएमएस कॉलनीसारख्या नागरी भागात नीलगाय फिरताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. भर वस्तीतील या वन्यजीवांच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सध्या पावसामुळे शिवारांमध्ये, मोकळ्या मैदानी भागांमध्ये भरपूर हिरवे गवत उगवलेले असूनही जंगलातील वन्यजीव, विशेषतः नीलगाय, नागरी वस्तीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जंगलात चारा कमी झाला आहे की वनविभाग दुर्लक्ष करत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा वनक्षेत्रात नीलगाय, रानडुक्कर व इतर वन्यजीवांचे वास्तव्य असल्याचे नोंदीत स्पष्ट झाले आहे. नुकत्याच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यजीवांची गणना करण्यात आली होती. परंतु याआधी नीलगाय केवळ शेतांमध्येच दिसून येत होत्या, मात्र आता शहरातील आरएमएस कॉलनीमध्ये ८ जुलै रोजी नीलगायचे दर्शन नागरिकांना झाले.
तिथे उगवलेल्या गवतावर नीलगाय चरण करताना दिसल्याने वन्यजीवांच्या अन्नाच्या कमतरतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरी भागात वन्यप्राण्यांचे आगमन ही मानव आणि प्राण्यांमध्ये संभाव्य संघर्षाला आमंत्रण देणारी स्थिती ठरू शकते.
यासंदर्भात वनक्षेत्रपाल (RFO) रूपाली शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.