नव्या वर्षात 3 अंगारक्या, 4 ग्रहणे, अधिक मास; जाणून घ्या सोने खरेदीचे मुहूर्त  
ठाणे

New Year 2026: नव्या वर्षात 3 अंगारक्या, 4 ग्रहणे, अधिक मास; जाणून घ्या सोने खरेदीचे मुहूर्त

सोन्याच्या खरेदीसाठी 23 एप्रिल, 21 मे आणि 18 जून असे 3 गुरुपुष्यामृत योग

पुढारी वृत्तसेवा

ठाणे ः पंधरा दिवसांवर आलेल्या नववर्ष अर्थात 2026 चे वेध सर्वांनाच लागले आहेत. या नव्या वर्षातील सण, चतुर्थी आणि सुट्ट्यांबद्दल उत्सुकता असते. 2026 या वर्षात 3 अंगारकी चतुर्थी, चार ग्रहणे आहेत. 4 ते 5 सण एकाच दिवशी आल्याने सुट्ट्यांवर चाकरमान्यांना पाणी सोडावे लागणार आहे. यंदा आधिक मास आल्याने जावईबापूंची सरबराई करावी लागणार आहे. सोन्याच्या खरेदीसाठी 23 एप्रिल, 21 मे आणि 18 जून असे 3 गुरुपुष्यामृत योग आहेत.

नव्या वर्षात 6 जानेवारी, 5 मे, 29 सप्टेंबर अशा 3 अंगारकी चतुर्थी आहे. 17 फेब्रुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण, 3 मार्च खग्रास चंद्रग्रहण, 12 ऑगस्ट खग्रास सूर्यग्रहण, 28 ऑगस्ट खंडग्रास चंद्रग्रहण अशी एकूण 4 ग्रहणे होणार आहेत. परंतु 3 मार्चचे एकच चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याची माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. नवीन वर्षाची दिनदर्शिका हाती आली की प्रथम सुट्ट्या पाहिल्या जातात. नवीन वर्षात महाशिवरात्र आणि लक्ष्मीपूजन या सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा 1 मे रोजी एकाच दिवशी आले आहेत.

स्वातंत्र्य दिन आणि पारसी नववर्ष 15 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आहेत. नूतन वर्षी 17 मे ते 15 जून ज्येष्ठ अधिकमास असणार आहे. त्यामुळे सर्व सण उशिरा येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नूतन वर्षांत चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी असल्याने अमावास्या संपल्यावर 19 मार्च रोजी सकाळी 6.53 नंतरच गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे. सन 2026 मध्ये हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी 14 सप्टेंबर रोजी येत आहे. तसेच दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी 8 नोव्हेंबर रोजी आहे. 31 मे रोजी ब्ल्यू मून तर 24 डिसेंबर 2026 रोजी सर्वांना सुपरमूनचे दर्शन होणार आहे, असे सोमण यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

बोहल्यावर चढू इच्छिणार्‍यांना मोजक्याच तारखा

अधिक मास, गुरू-शुक्र ग्रहांचा अस्त, चातुर्मासात आणि सिंहस्थ यामुळे नूतन वर्षात शुद्ध विवाह मुहूर्त कमी आहेत. विवाहेच्छुकांना मात्र काढीव, गौण मुहूर्तांवर विवाह करावा लागणार आहे. कारण जानेवारी, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात शुद्ध विवाह मुहूर्त नाहीत.

सुट्ट्यांवर पाणी

नव्या वर्षात महाशिवरात्र, लक्ष्मीपूजन हे रविवारी आले आहेत. तसेच महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा, 15 ऑगस्ट आणि पारसी नवीन वर्ष एकाच दिवशी येत असल्याने नोकरदारांच्या सुट्ट्यात कपात होणार आहे.

ज्यावेळी गुरू ग्रह सिंह राशीत येतो, त्यावेळी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. यावेळी गुरू ग्रह वक्री-मार्गी झाल्याने तीन वेळा सिंह राशीत येणार आहे. याला त्रिखंडी कुंभपर्व म्हणतात. तो कालावधी 31 ऑक्टोबर 2026 ते 24 मार्च 2027, 25 जून 2027 ते 26 नोव्हेंबर 2027 आणि 28 फेब्रुवारी 2028 ते 24 जुलै 2028. या कालात गुरू ग्रह सिंह राशीत राहणार आहे.
दा. कृ. सोमण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT