

वॉशिंग्टन ः सोने हे धातूंमध्ये पूर्णपणे वेगळे आणि अनोखे आहे. याच्या पिवळ्या चमकदार रंगामागे एक खास विज्ञान दडलेले आहे. सोने पिवळे दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या अणूंमध्ये असलेले इलेक्ट्रॉन हे खूप जलद गतीने फिरतात. हे वेगवान इलेक्ट्रॉन निळ्या रंगाच्या प्रकाशाला स्वतःमध्ये शोषून घेतात आणि फक्त पिवळा प्रकाश परावर्तीत करतात, ज्यामुळे आपल्या डोळ्यांना सोने पिवळ्या रंगाचे दिसते.
जगातील धातूंमध्ये सोने हे एकमेव आहे जे तेजस्वी पिवळे दिसते. इतर धातू, जसे की चांदी, तांबे किंवा लोह, एकतर चांदीसारखे पांढरे किंवा लाल-तपकिरी रंगाचे असतात. सोने पिवळे दिसण्यामागे अल्बर्ट आईन्स्टाईनचा सापेक्षतेचा सिद्धांत कारणीभूत आहे. सोन्याचा अणू खूप जड असतो. त्यामुळे, अणुकेंद्राजवळ असलेले इलेक्ट्रॉन जवळजवळ प्रकाशाच्या वेगाजवळ फिरतात. या अत्यंत जलद गतीमुळे, इलेक्ट्रॉन्सचे नेहमीचे वर्तन बदलते. त्यांच्या कक्षा किंचित लहान होतात आणि त्यांची ऊर्जा पातळी बदलते.
या बदलांमुळे, इलेक्ट्रॉन जास्त ऊर्जा असलेल्या (लहान तरंगलांबीच्या) निळ्या रंगाच्या प्रकाशाचे अधिक शोषण करतात. पिवळा आणि लाल रंगाचा प्रकाश शोषला जात नाही, तो आपल्या डोळ्यांपर्यंत परत येतो. यामुळेच सोने आपल्याला तेजस्वी पिवळे दिसते. जर सापेक्षतेचा सिद्धांत लागू नसता, तर सोनेदेखील चांदीसारखे पांढरे दिसले असते. याच सापेक्षता परिणामामुळे सोन्याला अत्यंत स्थिरता मिळते. सोने हवा, पाणी किंवा अॅसिडमुळे सहजपणे खराब होत नाही. या स्थिरतेमुळेच, प्राचीन काळातील सोन्याचे दागिने आजही चमकत आहेत. सोन्याची दुर्मीळता, सुंदरता आणि ही रासायनिक स्थिरता यांमुळेच ते मौल्यवान मानले जाते. लोक याचा वापर गुंतवणूक, दागिने आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत करतात.