नव्या सर्पजातीमुळे सह्याद्री समृद्ध  pudhari photo
ठाणे

Sahyadri Biodiversity : नव्या सर्पजातीमुळे सह्याद्री समृद्ध

नव्या वृक्षांच्या शोधाने ‌‘परीघ‌’ विस्तारालाही संरक्षणाचीगरज

पुढारी वृत्तसेवा

ठाणे ः जागतिक जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्रीत अलीकडील संशोधनांमुळे जैवविविधतेचा परीघ लक्षणीयरीत्या विस्तारला आहे. सरीसृप, उभयचर, मासे, कीटक आणि कोळ्यांसह अनेक समूहांमध्ये नव्या प्रदेशनिष्ठ (एन्डेमिक) प्रजातींची नोंद वाढली असून, या परिसंस्थेतील सूक्ष्म अधिवासांचे संवर्धन तातडीचे ठरत आहे.

किंग कोब्राच्या डीएनए अभ्यासातून चार स्वतंत्र प्रजातींना मान्यता मिळाली असून, पश्चिम घाटातील स्वतंत्र वंशवेस्टर्न घाट किंग कोब्रा या परिसराच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्क्रांतीला अधोरेखित करतो. यासोबतच आंबोली परिसरात नव्या बेडकांच्या प्रजातींचा शोध, तसेच आंबोलीतील महादेव मंदिराजवळील कुंडात आढळणारा ‌‘शिस्टुरा हिरण्यकेशी‌’ हा गोड्या पाण्यातील मासा, आणि फक्त आंबा घाटात दिसणारी ‌‘निमास्पिस आंबा‌’ ही पाली यांसारख्या अत्यल्प अधिवासांतील जैवसंपदा सह्याद्रीची नाजूक समृद्धी दर्शवते.

सह्याद्रीतील वैविध्यपूर्ण जंगलामध्ये बहुसंख्य उभयचर व सरपटणाऱ्या प्रजाती मोठ्याप्रमाणावर आहेत. सह्याद्रीच्या अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार, 2006 नंतरच्या नोंदींनी ‌‘बुफो कोयनाएन्सिस‌’ आणि ‌‘राब्डॉप्स ऑलिव्हेशियस‌’ यांसारख्या प्रजातींचा शोध लागला आहे. किंग कोबारा जातीतील या नव्या प्रजाती आहेत. संरक्षित क्षेत्राबाहेरील जंगलतोड, खाणकाम, एकपीक शेती व गुरे चराईमुळे अधिवास कमी होत असले तरी मूळ सह्याद्रीचे जंगल कमी होत असल्याचे हेलक्षान आहे. उत्तर-पश्चिम घाट उत्क्रांतीने तरुण असल्याने येथे दिसणाऱ्या रूपानुरूप प्रजातींमध्येही अनुवांशिक पातळीवर भेद स्पष्ट होत आहेतयामुळे सूक्ष्म अधिवासांचे संरक्षण आणखी आवश्यक ठरले आहे.

सह्याद्रीतील पठारी, सडे व निम-सदाहरित जंगलांची जुळवाजुळव पाली-सर्ड्यांसाठी अनुकूल आहे. अक्षय खांडेकर यांच्या निरीक्षणात ‌‘आंबा ड्वार्फ गेको‌’ आणि ‌‘कोयना ड्वार्फ गेको‌’ या केवळ एकाच ठिकाणी आढळणाऱ्या प्रजातींचा उल्लेख येतो. हे नैसर्गिक कीटक नियंत्रक अन्नसाखळीत महत्त्वाचे घटक असल्याने त्यांच्या अधिवासांचे रक्षण अपरिहार्य आहे. कीटकसमूहात, डॉ. दत्तप्रसाद सावंत ‌‘मायरिस्टिका स्वॅम्प‌’सारख्या दलदलीतच सीमित असलेल्या टाचण्यांचे उदाहरण देतात. अगदी किरकोळ प्रदूषणानेही प्रजनन खंडित होऊन स्थानिक नामशेष होण्याची शक्यता वाढते.

पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक म्हणून या प्रजातींचे अस्तित्व महत्त्वाचे आहे.कोळ्यांच्या प्रदेशनिष्ठतेकडेही लक्ष वेधताना राजेश सानप ‌‘थ्रिगमोपीयस इग्निसिस‌’ (आंबोली), ‌‘इंडोथेल ड्युमिकोला‌’ (पुणे परिसर) आणि आरेतील ‌‘रॉबस्ट ट्रॅपडोर‌’च्या पुनर्शोधाचा संदर्भ देतात. कोळ्यांचे विस्थापन-अनुकूलन अशक्यप्राय असल्याने अधिवास-संवर्धन हाच उपाय उरतो. याच धर्तीवर, हेमंत ओगले फुलपाखरांच्या परागीकरण-भूमिकेवर भर देतातफुलपाखरांची विविधता व घनता ही जंगलाच्या आरोग्याची जैविक सूचक आहे.

आंबोलीमधील बेडूक जातीच्या सापडलेल्या नव्या प्रजाती येथीलसमृद्ध जंगलाची प्रचिती देतात. सह्याद्रीची वाढती वैविध्यता ही अभिमानाची बाब असली, तरी तिचा परीघ टिकवण्यासाठी स्थानिक समुदाय, संशोधक आणि शासन यांची एकत्रित, क्षेत्रनिष्ठ कृतीसूक्ष्म अधिवासांचे कायदेशीर संरक्षण, प्रदूषण-नियंत्रण, आणि विवेकी जमीन वापर अत्यावश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT