नेवाळी : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून नेवाळी नाका येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल प्रकल्पाला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे 282 कोटी रुपयांच्या निधीतून हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड आणि तालुका प्रमुख चैनू जाधव यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
अंबरनाथ, बदलापूर ते कर्जत या मार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे नेवाळी नाका येथे गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र कोंडीची समस्या निर्माण झाली होती. हा नाका कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर शहरांना ग्रामीण भागाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत. परिणामी नागरिकांना तासंतास कोंडीत अडकून राहावे लागत होते. त्ामुळे या नेवाळी नाका परीसरात रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांनाही अडथळे येत
असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून प्रकल्पाला गती मिळाली आणि अखेर प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा उड्डाणपूल झाल्यास येथील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे.
या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प मंजूर झाला असून उड्डाणपूलामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचणार आहेत. स्थानिक नागरिकांनी निर्णयाचे स्वागत करत काम वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मंजुरी मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.