ठाणे : ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. गतवर्षी आमचे 38 नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपशी युती करणार नाही. मात्र शिवसेनेने सन्मानपूर्वक जागा सोडण्याचा प्रस्ताव दिल्यास युती केली जाईल, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी दिली.
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस वगळून भाजपने शिवसेनेची युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर ठाण्यात भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेने महायुतीचा महापौर होईल, अशी भूमिका मांडून युतीबाबतचा चेंडू भाजपच्या हाती दिला आहे. आता मुंबईप्रमाणे ठाण्यातही युती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शक्य नसल्याचे मैत्रीपूर्वक लढतीचा पर्याय ठेवण्यात आलेला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला युतीमध्ये सामील करण्याची भूमिका शिवसेना आणि भाजपने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला सोमवारी पत्रकार परिषद घेऊन स्वबळाच्या नाऱ्याचा पुनरुच्चार केला.
राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपसोबत युती करणार नाही. शिवसेनेकडून अद्याप युतीचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे आम्ही 131 जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्धार करून नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत. सुमारे 400 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. शिवसेनेकडून सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव आला तरच आम्ही युती करणार आहोत. अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहेत. याबाबत अद्याप पक्ष नेतृत्वाकडून काही आदेश आलेले नाही, मात्र स्थानिक पातळीवर आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केल्याचे मुल्ला यांनी म्हटले आहे.