

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची जागांबाबत चर्चा सुरू झाली असताना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गृहीत धरले जात असल्याने मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. मंगळवारी राष्ट्रवादीने स्वतंत्र बैठक घेऊन आपली नाराजी व्यक्त केली.
नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली होती. आता मुंबईतही या दोन पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू असल्यामुळे नाराजीमध्ये भर पडली आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी भाजपा नेते सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यावर कोणाबरोबर चर्चा करायची याबाबत पक्षाकडून कोणतेही अधिकृत पत्र आले नसल्याचे शेलार यांनी नलावडे यांना सांगितले.
यावर नलावडे म्हणाले, अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांकडूनच घेतला जाईल. आमचे स्वतंत्र अस्तित्व भक्कम असून प्रत्येकाने एकमेकांचा मान-सन्मान राखला पाहिजे. तो न राखल्यास वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. परंतु, एकत्रच निवडणूक लढवावी,अशी आमची भूमिका आहे. मात्र, पक्षाने आदेश दिल्यास आम्ही एकटे लढायलाही तयार आहोत.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने सज्ज आहे. गरज पडल्यास आम्ही एकटे लढण्याची तयारीही ठेवली आहे,असे चव्हाण म्हणाले.
भाजपा महापालिका निवडणुका सर्वत्र स्वबळावर लढण्याचा विचार करत असताना मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेसोबत युती करण्याचे आदेश दिल्लीतून भाजपाश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यानुसार जागावाटपात मुंबईत भाजपाला, तर ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झुकते माप दिले जाणार आहे. अन्य ठिकाणी युती होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) गटाची युती होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. पण, भाजपा शिवसेनेशी (एकनाथ शिंदे) युती करणार का? याबाबत उत्सुकता आहे. प्रदेश भाजपाने या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली असताना मुंबई आणि ठाण्यात मात्र युती करण्याचे दोन्ही पक्षांनी संकेत दिले आहेत. याचे कारण म्हणजे केंद्रीय भाजपाने प्रदेश भाजपाला मुंबई, ठाण्यात युती करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. ही तडजोड करत असताना मुंबईत भाजपाला झुकते माप दिले जाईल. तर, एकनाथ शिंदे यांचा शब्द ठाण्यात पाळला जाणार आहे.
मुंबईत एकनाथ शिंदे यांनी 227 पैकी 120 ते 130 जागांची मागणी केली होती. त्यांनी उबाठा शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक फोडून आपल्या पक्षात घेतले आहेत. त्यामुळे आपल्याकडे आलेल्या माजी नगरसेवकांच्या संख्येचा दाखला देत शिंदे जागांची मागणी करत होते. मात्र, 227 जागांपैकी त्यांना 90 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. त्याचवेळी ठाण्यात स्थानिक भाजपा स्वबळावर लढण्याची भाषा करत असताना त्यांना शिवसेनेसोबत युती करण्यास सांगण्यात आले आहे. ठाण्यात भाजपाचे मावळत्या महापालिकेत 23 नगरसेवक होते. आता भाजपाला 133 पैकी ठाण्यात फक्त 35 ते 40 जागा मिळणार आहेत. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा शब्द राखताना भाजपाने राजधानी मुंबईत जादा जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जाणार आहेत.
युती झाली तर 50 जागांवर दावा
शिंदे सेना आणि भाजपा बैठकांना निमंत्रित केले जात नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरू केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने आक्षेप घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी मंगळवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला. तसेच मुंबई मनपा निवडणुकीत भाजप - शिवसेनेसोबत युती झाली तर 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असेल. यासंदर्भाचा अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केला जाणार आहे.
राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्रे दिल्यास राष्ट्रवादीला युतीत घेणार नाही, असा इशारा भाजपाने दिला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, साटम इतके मोठे नेते नाहीत की, त्यांच्या वक्तव्यामुळे युती तुटेल. तिन्ही पक्षांची युती पुढे कशी जाईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडे कोणताही प्रस्ताव गेलेला नाही. याबाबत अंतिम निर्णय अजित पवार घेतील.