ठाणे : राज्यभरात नवरात्रीमध्ये दांडिया-गरबाची मोठी धूम आज सोमवार ( दि. 22) रोजीपासून पाहायला मिळणार आहे. दरम्यान, नवरात्रीत महिला व तरुणींच्या सुरक्षेची विशेष काळजी पोलीस दलाने घेतली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी व अडचणीत सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दामिनी व पोलीस दीदी पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक चोवीस तास कार्यरत राहणार आहे.
दिवसेंदिवस महिलांबाबतच्या गुन्ह्यामध्ये वाढ होत चालली आहे. त्यातच नवरात्रीत महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस दलाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांना काही भामट्यांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस मुख्यालयात स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तसेच इतरही अनेक उपाययोजना योजण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयात देखील महिलांच्या सुरक्षेसाठी व मदतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रमुख महानगरातील सर्व पोलीस ठाण्यात दामिनी आणि पोलीस दीदी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अडचणीत सापडलेल्या महिलांच्या मदतीला त्वरित धावून जाणे, महिलांच्या तक्रारींची दखल घेऊन त्याचे निरासन करणे, महिलांच्या
बाबतीत घडणारे गुन्हे हाताळणे व तपास करणे, पीडित महिलांना मानसिक आधार देऊन त्यांचे समुपदेशन करणे, पीडित महिलांना कायदेविषय सल्ला व मदत करणे, शाळा, कॉलेज परिसरात गस्त घालून विद्यार्थिनींच्या अडीअडचणी जाणून घेणे हे दोन्ही पथक करणार आहेत.
दांडिया-गरबा आयोजकांना महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. गरबाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी महिला स्वयंसेवक नेमावेत, मंडपात सीसीटीव्ही असावेत तसेच पास असल्याशिवाय गरबाच्या ठिकाणी प्रवेश नको, मद्यपान करुन येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये, अशाप्रकारच्या सूचना आयोजकांना करण्यात आल्या आहेत.
ठाण्यातील ठाणेनगर, नौपाडा, राबोडी, वागळे, श्रीनगर, कोपरी, वर्तकनगर, कापूरबावडी, चितळसर, कासारवडवली, कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर या पोलीस ठाण्यात दामिनी पथक आणि पोलीस दीदी पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त नवरात्रीत गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांचे खास पथक साध्या वेशात राहून परिस्थितीवर नजर ठेवणार आहेत.