

पुणे: सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव सोमवार (दि. 22) ते गुरुवार (दि. 2 ऑक्टोबर) दरम्यान साजरा होणार आहे. सोमवारी घटस्थापनेदिवशी सकाळी 9 वाजता गोपालराजे पटवर्धन, पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.
’वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्यावर पहिल्याच दिवशी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री साडे आठ वाजता वाजता राधिका आपटे यांचे ’दशावतार’ सादरीकरण देखील होईल. तसेच, सायंकाळी 6 वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Latest Pune News)
घटस्थापनेच्या दिवशी रात्री साडे आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा, सजीव देखावा मिरवणूक हे यंदाचे आकर्षण असणार आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता सामूहिक श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दसऱ्याच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता हळदीकुंकू व ओटीचा कार्यक्रम होणार आहे, तर रात्री साडे नऊ वाजता रावणदहन कार्यक्रम होणार आहे.
उत्सवात सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ढोल-ताशा वादन सेवा, भजन, पारंपरिक नृत्य, सामूहिक गरबा ही यंदाची वैशिष्ट्ये असणार आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे.
या शिवाय श्रीसूक्त अभिषेक, श्री विष्णू सहस्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, असेही अग्रवाल यांनी या वेळी नमूद केले.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता लेखिका/कवयित्री सन्मान सोहळा आणि डॉ. कल्याणी हर्डीकर यांच्या ‘जागर विश्वजननीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. मंजिरी भालेराव यांच्या शुभहस्ते होणार आहे.
24 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महिला पोलिस व आरटीओ महिला अधिकारी सन्मान कार्यक्रम आणि सायंकाळी साडेसात वाजता करवीरपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्या नरसिंह स्वामी महाराज यांच्याहस्ते आरती होणार आहे.
महिला एअरफोर्स अधिकारी सन्मान आणि कन्यापूजन
गुरुवारी (25 सप्टेंबर) साडेपाच वाजता महिला एअरफोर्स अधिकारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर, ललिता पंचमीच्या दिवशी कन्यापूजन हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (27 सप्टेंबर) चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण आणि कथक नृत्यकला सादरीकरण असे कार्यक्रम होतील.
‘नारी तू नारायणी - सन्मान सोहळा आणि दांडिया’
रविवारी (28 सप्टेंबर) पौराणिक विष घेतलेल्या स्पर्धांमधील अंतिम तीन विजेत्यांचे सादरीकरण सायंकाळी 5 वाजता होईल. तर, 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नवे स्टार्टअप्स सुरू करणाऱ्या महिलांचा सन्मान होणार आहे. उत्सवातील मुख्य कार्यक्रम नारी तू नारायणी - सन्मान सोहळा दि.30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून, पूजा मिसाळ, मीरा बडवे आणि सिस्टर ल्युसी कुरियन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर,दि. 1 ऑक्टोबर रोजी महिला एचआर अधिकारी सन्मान आणि दांडिया नाईट आयोजित करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि विमा
उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा काढण्यात आला आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात 50 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 50 हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून, विशेष म्हणजे या वर्षी दिव्यांग बांधवांसाठी दुपारी 2.30 ते 3.30 या वेळामध्ये व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याद्वारे त्यांचे दर्शन सुखकर करण्याचा मंदिराच्या व्यवस्थापनाने प्रयत्न केलेला आहे. तरी या नवरात्र उत्सवात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे विश्वस्त मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे