

कोल्हापूर : दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर कृपाद़ृष्टी ठेवणार्या आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारी विधिवत घटस्थापनेने शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होणार आहे. देशातील 51 व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेला अंबाबाई मंदिर परिसर नवरात्रौत्सवासाठी मंगलमयी वातावरण आणि रोषणाईने सजला आहे.
दुर्गाज्योत नेण्यासाठी विविध राज्यांतून आलेल्या भाविकांच्या ‘उदं गं अंबे’ अशा जयघोषाने उत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिर आवार दुमदुमला. यंदा दहा दिवसांचा नवरात्रौत्सव साजरा होणार असून मांगल्याचे पर्व अनुभवण्यासाठी भाविक आतूर झाले आहेत. सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी अंबाबाईच्या मुख्य गाभार्यात श्रीपूजक मुनीश्वरांच्या हस्ते मंत्रोच्चार व पारंपरिक तालवाद्यांच्या गजरात घटस्थापनेचा विधी करण्यात येणार आहे.
सकाळी साडेसहा, साडेआठ व साडेअकरा वाजता देवीला नित्यअभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता मानकरी जाधव घराण्यातील सदस्याकडून तोफेची सलामी देण्यात येईल व त्यानंतर शासकीय पूजेने नवरात्रौत्सवाला प्रारंभ होणार आहे. दुपारी दोन वाजता अंबाबाईची कमलादेवी रूपात जडावी अलंकार पूजा सजवण्यात येणार आहे. दहा दिवसांच्या काळात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षा व सुविधेसाठी जय्यत तयारी केली आहे.
रोज पालखीसह पंचमी, नगर प्रदक्षिणेचा सोहळा
नवरात्रौत्सवात अंबाबाईची रोज रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूक काढली जाते. फुलांनी सजवलेली पालखी गरुड मंडपातून मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. हजारो भाविकांच्या साक्षीने होणार्या या पालखी सोहळ्यासाठी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. ललिता पंचमीदिवशी अंबाबाई त्र्यंबोली भेटीचा सोहळा तर अष्टमीदिवशी देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा होणार आहे.