मुरबाड शहर: मुरबाड शहरातील विविध ठिकाणी विनापरवाना लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरात फलकांवर मंगळवारी नगरपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.
नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवत शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, म्हसा मार्ग तसेच विद्युत खांब, भिंती आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर्स काढून ट्रॅक्टरमध्ये भरून जप्त केले.
या कारवाईदरम्यान विविध शाळा, खासगी क्लासेस, व्यावसायिक आस्थापना तसेच इतर जाहिरातींसाठी लावण्यात आलेले अनेक बॅनर्स हटविण्यात आले. शहरातील सार्वजनिक मालमत्तेचा वापर करून परवानगीशिवाय जाहिराती लावण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत होती.
अनेक ठिकाणी विद्युत खांब, चौक, रस्त्यांच्या कडेला तसेच भिंतींवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाल्यामुळे शहराचे सौंदर्य बाधित होत असल्याच्या तक्रारी नगरपंचायतीकडे येत होत्या.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने थेट कारवाई करत संबंधित फलक हटविले. सार्वजनिक जागांचा मनमानी वापर आणि अनियंत्रित बॅनरबाजीमुळे शहराच्या स्वच्छ व सुबक प्रतिमेला धक्का बसत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई एकदिवसीय ठरणार की सातत्याने राबविण्यात येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण यापूर्वीही काही ठिकाणी हटविण्यात आलेले बॅनर्स पुन्हा दिसून आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पुन्हा अनधिकृत बॅनर्स लावले गेल्यास प्रशासन कोणती पुढील पावले उचलणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
नगरपंचायतीच्या या कारवाईचे काही नागरिकांनी स्वागत केले असून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. प्रशासनाच्या या मोहिमेमुळे अनधिकृत बॅनरबाजीला कितपत आळा बसतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
"विनापरवाना बॅनरबाजीमुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेतली आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे बॅनर किंवा जाहिरात फलक लावण्यापूर्वी नगरपंचायतीची आवश्यक कायदेशीर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मुरबाड शहर अधिक सुसज्ज, स्वच्छ आणि शिस्तबद्ध बनविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.मनोज म्हसे, मुख्याधिकारी नगरपंचायत मुरबाड
नगरपंचायतीची भूमिका स्वागतार्ह आहे. या बेकायदेशीर बॅनरबाजीने संपूर्ण शहरातील परिसर व्यापून टाकले होते. या कारवाईमुळे मुरबाड शहराने विद्रुपीकरणमुक्त सुटकेचा श्वास घेतला असून पुन्हा हे बॅनर लागू नये, यासाठी नगरपंचायतीने ठोस उपाययोजना आखण्याची गरज आहेकृष्णकांत सुरेश तुपे, कॉग्रेस नेते