

पोलादपूर: आणखी किती जणांना दरीत कोसळावे लागणार? आणखी किती संसार उद्ध्वस्त झाल्यावर शासनाला जाग येणार?" असा संतप्त सवाल आता आंबेनळी घाट परिसरातील नागरिक विचारत आहेत.
कारण गेल्या अनेक वर्षांपासून आंबेनळी घाटाला पर्यायी मार्गाची मागणी होत असतानाही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा प्रश्न अद्याप कागदावरच अडकून पडला आहे.खेड महाबळेश्वर मार्ग होऊ शकतो मग आंबेनळीला पर्याय असताना का नवीन मार्ग निर्मिती केली जात नाही लोकप्रतिनिधी ची उदासीनता की या दुर्लक्ष म्हणावे लागेल पोलादपूर–महाबळेश्वर–सुरूर–सातारा या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील आंबेनळी घाट हा राज्यातील सर्वाधिक धोकादायक घाटांपैकी एक मानला जातो.
विशेषतः बावली टोक ते दाभिल टोक हा टप्पा म्हणजे अक्षरशः मृत्यूची वाट बनला आहे. एका बाजूला शेकडो फूट खोल दरी, दुसऱ्या बाजूला डोंगरकडा आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्था यामुळे प्रत्येक प्रवास जीव मुठीत धरूनच करावा लागतो. गेल्या दहा-बारा वर्षांत या घाटात झालेल्या विविध अपघातांत ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांना जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले; मात्र दुर्दैवाने प्रशासनाची झोप अद्याप उडालेली दिसत नाही.
मागण्या झाल्या, निवेदने दिली; पण फाईलींची धूळ काही झटकली नाही. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यायी मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वृत्तपत्रांतून वारंवार आवाज उठविण्यात आला. निवेदने देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. आश्वासने मिळाली.
मात्र प्रत्यक्षात एक विटही हललेली नाही. "अपघातानंतर शोक व्यक्त करायचा आणि पुन्हा सर्व काही विसरायचे" अशीच प्रशासनाची कार्यपद्धती असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. २ कि.मी.चा रस्ता वाचवू शकतो अनेकांचे प्राण आंबेनळी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कापडे पिताळवाडी देवळे- दाभिळ रस्ता अस्तित्वात आहे याला जोडून दाभिळ ते कुंभरोशी या भागात अवघ्या दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता विकसित केल्यास घाटातील सर्वाधिक धोकादायक टप्पा टाळता येऊ शकतो.
तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांच्या मते हा सर्वात व्यवहार्य व सुरक्षित पर्याय आहे. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी रस्त्याची मागणी केली मात्र प्रश्न रस्त्याचा नाही, तर प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा आहे. प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वेक्षण, प्रशासकीय मान्यता, निधी उपलब्ध करून हा मार्ग अल्पावधीत पूर्ण होऊ शकतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
शिवकालीन मार्गही दुर्लक्षित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात असलेला आड किनेश्वर–रामवरदायिनी–पार हा ऐतिहासिक मार्गही पर्याय म्हणून पुढे आला होता. अवघ्या दोन किलोमीटरच्या अपूर्ण टप्प्यामुळे हा मार्ग आजही रखडलेला आहे. माजी सरपंच प्रकाश कदम आणि पार ग्रामस्थांनी अनेकदा या मार्गासाठी पाठपुरावा केला. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातूनही मागणी करण्यात आली. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे हा प्रस्तावही धूळ खात पडल्याची स्थिती आहे.
मंत्र्यांनी आता भूमिका स्पष्ट करावी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार मकरंद पाटील यांनी आता केवळ सहानुभूती व्यक्त न करता ठोस निर्णय घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. प्रत्येक अपघातानंतर मदतीच्या घोषणा होतात; परंतु अपघातच टाळण्यासाठी काय केले जाते, हा खरा प्रश्न आहे.
जागतिक पर्यटनस्थळ महाबळेश्वरला जोडणाऱ्या या प्रमुख मार्गावर दरवर्षी लाखो पर्यटक प्रवास करतात. त्यामुळे हा केवळ स्थानिकांचा प्रश्न नसून राज्याच्या पर्यटन, वाहतूक आणि सुरक्षिततेशी निगडित विषय आहे. जनतेचा थेट सवाल अपघात झाल्यावर शोकसभा घेणे सोपे आहे; पण अपघात होणारच नाहीत यासाठी शासनाने काय केले? आंबेनळी घाटातील प्रत्येक मृत्यूची जबाबदारी आता केवळ चालकांवर नाही, तर वर्षानुवर्षे निर्णय टाळणाऱ्या यंत्रणेवरही आहे," अशी तीव्र भावना परिसरातून व्यक्त होत आहे. आता तरी शासनाने फाईलींच्या ढिगाऱ्यातून बाहेर येत पर्यायी मार्गाचा निर्णय घ्यावा; अन्यथा आंबेनळी घाटातील प्रत्येक नवीन अपघात प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे करत राहील.