Murbad Kadampada Highway Pudhari
ठाणे

Murbad Kadampada Highway: वर्ष उलटले, मुरबाड-कदमपाडा महामार्गाचे काम केव्हा होणार?

मोबदला, वृक्षतोड अन् ठेकेदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

किशोर गायकवाड

मुरबाड: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील मुरबाड ते कदमपाडा या उर्वरित मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम अद्याप सुरू झालेले नसताना आता भूसंपादनाच्या प्रक्रियेवरून शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे रस्त्याच्या कामाला वर्ष उलटूनही प्रत्यक्ष सुरुवात नाही, तर दुसरीकडे बाधित शेतजमिनींच्या मोजणीपासून वृक्ष, पाणीपुरवठा वाहिन्या आणि खासगी मालमत्तांच्या मोबदल्यापर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम नेमके कधी सुरू होणार आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

भूसंपादनाबाबत बाधित शेतकऱ्यांना पत्रव्यवहार प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष मोजणीदरम्यान अनेक शेतकऱ्यांना नोटिसा मिळाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. काही शेतजमिनी बाधित असूनही संबंधित यादीत शेतकऱ्यांची नावे नसल्याचे, तर काही गावांमध्ये महामार्गाशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या जमिनींचे भूक्रमांक बाधित यादीत समाविष्ट झाल्याचे आरोप होत आहेत.

त्यामुळे संपूर्ण भूसंपादन सर्वेक्षणाच्या अचूकतेबाबतच शेतकरी वर्गाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे बाधित फळझाडे, राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते हद्दीतील वृक्ष तसेच वन विभागाच्या अखत्यारीतील झाडांच्या मोजणी अहवालाबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.

याशिवाय पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन, शासकीय व खासगी बांधकामे यांचे प्रत्यक्ष मोजमाप, नुकसानभरपाई आणि मोबदल्याची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण झाली आहे का? याचीही खात्री होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केवळ क्रॅशर परवानगीसाठी तोट्याची निविदा?

दुसरीकडे, संबंधित काम मिळविलेल्या एजन्सीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. एजन्सीने मुरबाड परिसरात स्वतःचे दगडखाण व दगडफोड यंत्राचे काम सुरू केल्याची चर्चा असताना महामार्गाच्या प्रत्यक्ष कामात मात्र अपेक्षित हालचाल दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT