Pudhari Impact Pudhari
ठाणे

Pudhari Impact: मुरबाडच्या दीडशे वर्षांच्या ऐतिहासिक वारसाचे जतन होणार

जुन्या तहसील व पोलीस ठाण्याचा कायापालट सुरू; दै. पुढारीने केला पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

किशोर गायकवाड

मुरबाड शहर: मुरबाड शहराच्या मध्यवर्ती भागात उभ्या असलेल्या आणि सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास जपणाऱ्या जुन्या तहसील कार्यालय व शेजारील पोलीस ठाण्याच्या इमारती काही महिन्यांपूर्वीपर्यंत अक्षरशः भग्नावस्थेत होत्या. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरात कचऱ्याचे ढीग, वाढलेले गवत आणि मोडकळीस आलेल्या भिंती असे चित्र दिसत होते.

नागरिकांनी वारंवार स्वच्छता व दुरुस्तीची मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2025 मध्ये दै. पुढारीने या विषयावर लक्ष वेधल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून, आता या ऐतिहासिक वास्तूंच्या पुनरुज्जीवनाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.

तहसील कार्यालय व इतर विभाग एमआयडीसी परिसरात स्थलांतरित झाल्यानंतर हा भाग पूर्णतः ओस पडला होता. या मोक्याच्या जागेवर पाडकाम करून इतर उपयोगासाठी वापरण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा होती. मात्र नागरिकांच्या मागणीला आणि माध्यमांच्या पाठपुराव्याला यश येत हा वारसा वाचवण्यात आला आहे.

या संपूर्ण नुतनीकरणासाठी डीपीडीसी अंतर्गत सुमारे 1 कोटी 18 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली. या कामांमुळे केवळ ऐतिहासिक वास्तूंचे जतन होणार नसून, नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.

एकेकाळी दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या या वास्तू आता नव्या रूपात उभ्या राहत असून, मुरबाडच्या इतिहासाला नवसंजीवनी मिळत आहे. भविष्यात हा परिसर इतिहास आणि प्रशासन यांचा संगम ठरणार असून, नागरिकांच्या दृष्टीनेही तो एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनणार आहे.

भाई कोतवाल, दगडूलाल खुपचंद शहांचा वारसा

सन 1864 मध्ये ब्रिटिश काळात उभारण्यात आलेल्या या इमारतींना केवळ प्रशासकीयच नव्हे तर ऐतिहासिक दृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या अनेक घटनांचा साक्षीदार ठरलेल्या या ठिकाणी 1942 च्या आंदोलनाच्या काळात स्वातंत्र्यसैनिक वीर भाई कोतवाल यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कारवाया राबवण्यात आल्या होत्या.

तसेच अनेक स्वातंत्र्यसैनिकांना याच तहसील कार्यालयात व पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री मुरबाडचे स्वातंत्र्यसैनिक दगडूलाल खुपचंद शहा यांनी याच ठिकाणी तिरंगा फडकावून स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला होता. त्यामुळे या वास्तूंना राष्ट्रीय वारशाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

विविध विभाग होणार स्थलांतरित

सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे सुरू असून, येथील जुन्या इमारतींचा मूळ ऐतिहासिक ठेवा जपत त्यांना आधुनिक स्वरूप दिले जात आहे. या प्रकल्पांतर्गत सेतू सुविधा केंद्र, आधार केंद्र, मंडळ अधिकारी कार्यालय, हिरकणी कक्ष, कॅन्टीन तसेच तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे न्यायालयीन कक्ष उभारण्यात येणार आहेत. तसेच आठवड्यातून एक-दोन वेळा येथे सुनावणी होण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय जुन्या अभिलेखांचे प्रदर्शन, मुरबाडच्या इतिहासाचे दर्शन घडवणारी तैलचित्रे आणि बहुउद्देशीय सभागृह उभारण्याची योजना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT