

डोंबिवली: डोंबिवलीतील वादग्रस्त रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी (55, रा. अनुसया निवास, चोळेगाव-ठाकुर्ली) पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या रील स्टारच्या घरातून 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसांसह प्राणघातक शस्त्रांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
ही शस्त्रे लपविण्यासाठी त्याने घरातील चपलांच्या स्टॅन्डमध्ये गुप्त कप्पा तयार केल्याचे कारवाई दरम्यान आढळून आले. खासगी गुप्तरांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटसह मानपाडा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
गँगस्टर स्टाईल व्हीडिओमुळे प्रसिद्ध असलेल्या रील स्टार सुरेंद्र पाटील याच्या विरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचे कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या दावडी येथील पाटीदार भवन श्री एकविरा स्वप्ननगरी इमारतीत कार्यालय असून तेथेच निवासही आहे.
पोलीस पथकांनी शनिवारी मध्यरात्री दावडी येथील त्याच्या घरावर धाड टाकली असता घरातील चपलांच्या स्टँडमध्ये एक गुप्त कप्पा आढळून आला. या कप्प्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ठेवलेला आढळून आला.
या कारवाईत 7 बंदुका, 371 जिवंत काडतुसे आणि 167 एअर गनच्या गोळ्या जप्त केल्या. याशिवाय तलवार, चाकू, कोयते, आदी धारदार शस्त्रे देखील जप्त करण्यात आली. या शस्त्रांची किंमत जवळपास 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या बंदुकांपैकी 5 देशी बनावटीच्या पिस्तूल आणि रिव्हॉल्वर असून त्यापैकी काहींवर आणि नक्षी आहे.
आरोपी सुरेंद्र पाटील याचे इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या शस्त्रांचा वापर तो व्हीडिओमध्ये प्रॉप्स म्हणून करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मानपाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून तयार केलेले व्हीडिओ व्हायरल करणारा सुरेंद्र पाटील याला यापूर्वीही खंडणी विरोधी पथकाने डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यातून अटक केली होती.
50 कोटींच्या पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून याच रील स्टार वजा बिल्डर असलेल्या सुरेंद्र पाटील याला काही वर्षांपूर्वी भोंदू बुवांनी चक्क 56 लाखांचा गंडा घातला होता. ही घटना जून 2022 दरम्यान घडली होती. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर 2023 दरम्यान अशाच पद्धतीने काही भोंदू बाबांनी झटपट पैशांच्या हव्यासाला भुललेल्या या रील स्टारला 50 लाखांचा गंडा घातला होता.
ठाकुर्लीत राहणारा सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी याचे समाज माध्यमांपैकी इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.